अवकाळीच्या फटक्याने रानमेवा संकटात : आवक घटल्याने आदिवासींच्या रोजगारावरही गदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 07:59 PM2023-04-23T19:59:58+5:302023-04-23T20:00:07+5:30
मधुकर ठाकूर उरण : उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि विविध औषधी गुणधर्म असणारा रानमेवा मात्र अवकाळी पावसामुळे संकटात सापडला ...
मधुकर ठाकूर
उरण : उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि विविध औषधी गुणधर्म असणारा रानमेवा मात्र अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. अवकाळीच्या फटक्याने रानमेव्याच्या बहरण्यावरच विपरित परिणाम झाला असल्याने यावर्षी बाजारपेठेत फारशा प्रमाणात दाखल झालाच नसल्याने दिसून येत आहे.त्यामुळे आबालवृद्धांसह सर्वांनाच प्रतिक्षा असलेल्या या मधूर रानमेव्याची चव या वर्षी मिळणे कठीण झाले आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवात होताच जंगलात नैसर्गिकरीत्या तयार झालेला रानमेवा बाजारात येतो.यामध्ये करवंदे, कैरी , अंजीर ,काजू, चिंच, जांभळे, रांजणं आदींचा समावेश असतो. काळीमैना नावाने सर्वांना परिचित असलेली काळीभोर रसाळ करवंद आदिवासी साग अथवा पळसाच्या पानांच्या द्रोणातुन तर ठीक ठिकाणी वाट्यावरही विक्री करताना दिसतात. जंगलातील जाळीदार काटेरी झाडे झुडपात आढळून येणारी हिरवीगार करवंदाचा उपयोग सीझनमध्ये स्वयंपाक घरात चटणी, ठेचा म्हणून दैनंदिन जीवनातही होत असतो.
खायला रुचकर असणाऱ्या कैरी , अंजीर ,काजू, चिंच, जांभळे, रांजणं आदी प्रकारच्या रानमेव्यांची सीझनमध्ये सर्वानाच ओढ असते. या रानमेवामुळे आदिवासींना काही प्रमाणात रोजगारही मिळत असतो. मात्र वारंवार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे मात्र जंगलात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रानमेव्यावर गंडांतर आले आहे.अवकाळी पावसामुळे रानमेवा संकटात सापडला आहे.विपरित परिणाम झाल्याने बाजारात दाखल होणाऱ्या रानमेव्याची आवक घटली आहे.त्यामुळे आदिवासींचा रोजगारही बुडाला असल्याची माहिती सीताबाई कातकरी यांनी दिली.