बलात्कारी आरोपीची आत्महत्या
By admin | Published: July 12, 2015 02:46 AM2015-07-12T02:46:12+5:302015-07-12T02:46:12+5:30
बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री खारघर येथे घडली.
नवी मुंबई : बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीने पोलिसांच्या ताब्यातून पळ काढून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री खारघर येथे घडली. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. घरझडतीसाठी त्याला सोबत नेले असता पोलिसांना चकमा देऊन त्याने रो हाऊसच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली.
गणेश कुमावत (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर १७ वर्षीय मुलीवर बलात्काराचा गुन्हा शुक्रवारी दुपारी दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान घरझडतीसाठी पोलिसांचे एक पथक खारघर सेक्टर १२ येथील त्याच्या राहत्या घरी गेले होते. यावेळी कुमावत हा देखील त्यांच्यासोबत होता. बलात्कारावेळी वापरलेले त्याचे कपडे व इतर पुराव्यांचा पोलीस शोध घेत असतानाच त्याने पोलिसांना चकमा देऊन राहत्या रो हाऊसच्या छतावर पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचाही प्रयत्न केला. परंतु तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवर चढून त्याने उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उपचारासाठी त्याला वेळीच वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले असता रात्री ११. ३० च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुमावत मूळचा राजस्थानचा असून त्याचे कुटुंबीय गावी राहतात. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचे काम करणारा कुमावत हा अनेक वर्षांपासून तिथे एकटाच राहायला होता.
खारघर परिसरात घरकामासाठी कामगार महिला पुरवणारी एक महिला या प्रकरणात सहआरोपी असल्याचे समजते. या महिलेने त्याच परिसरातील बिगारी कामगार कुटुंबातील १७ वर्षीय मुलीला ९ जुलै रोजी दुपारी घरकामाच्या बहाण्याने कुमावतच्या घरी नेले होते. या मुलीला घरात सोडल्यानंतर या महिलेने घराचे दार बाहेरून बंद केल्यानंतर कुमावतने बलात्कार केल्याची तक्रार त्या मुलीने केली होती. अधिक तपासाकरिता हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)