Crime News: स्वतःच्या 3 वर्षीय मुलीची हत्या करुन पुरला मृतदेह, आरोपी पित्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 10:10 PM2022-04-06T22:10:27+5:302022-04-06T22:12:47+5:30
रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाने घरगुती भांडणातून स्वतःच्या तीन वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नवी मुंबई : रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाने घरगुती भांडणातून पत्नी व मुलीला केलेल्या मारहाणीत तीन वर्षीय मुलीच्या मृत्यूची घटना घडली आहे. मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने मृतदेह परिसरातल्या डेब्रिजच्या भरावामध्ये पुरला होता. मात्र हा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि काही तासातच खारघर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी आरोपी पित्यास अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, तळोजा येथील तलावालगतच्या डेब्रिजमध्ये मंगळवारी सकाळी एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. लुंगीत गुंडाळलेला हा मृतदेह त्याठिकाणी पुरण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याठिकाणी एक मृतदेह असल्याची माहिती अन्वर पटेल यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार खारघर पोलिसांचे पथक दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
आरोपीचा पाठलाग करुन ताब्यात घेतले
तिकडे, मुलीच्या फोटोवरुन तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात होता. त्याचदरम्यान उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाला ती मुलगी पापडी पाडा गावातील रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाची असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक त्याठिकाणी गेले असता, आरएएफच्या गणवेशातील एक व्यक्ती पळून जाताना दिसली. यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
असा झाला चिमुकलीचा मृत्यू
सुरवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण नंतर त्याने आपल्याच हातून मुलीची हत्या झाल्याची कबुली दिली. त्यानुसार परशुराम तिपन्ना (३९) याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांने सांगितले की, सोमवारी रात्री त्याचे पत्नी भाग्यश्रीसोबत भांडण झाले होते. या भांडणात त्याने पत्नी व मुलगी मीनाक्षी (३) यांना मारहाण केली. दरम्यान मुलगीला उचलून आपटल्याने डोक्यावर गंभीर दुखापत होऊन ती जागीच मृत पावली. यानंतर त्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुलीचा मृतदेह तळोजा तलावालगत डेब्रिजच्या भरावामध्ये नेवून त्याठिकाणी पुरण्याची प्रयत्न केल्याची कबुली दिली.