ऐरोलीमध्ये आढळला दुर्मिळ सोनेरी कोल्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 01:08 PM2019-07-03T13:08:16+5:302019-07-03T13:11:41+5:30
ऐरोलीमधील सेक्टर 10 येथे सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोल्हा आढळून आला आहे. मागील काही दिवसांपासून तो सेक्टर 10 येथील पाण्याच्या टाकीलगतच्या परिसरातील झाडीमध्ये फिरत होता
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - ऐरोलीमधील सेक्टर 10 येथे सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोल्हा आढळून आला आहे. मागील काही दिवसांपासून तो सेक्टर 10 येथील पाण्याच्या टाकीलगतच्या परिसरातील झाडीमध्ये फिरत होता. याची माहिती परिसरातील प्राणीमित्रांना मिळताच बुधवारी (3 जुलै) त्यांनी या कोल्ह्याला पकडून ठाणे वनविभाग मार्फत मुलुंडच्या रॉ या संस्थेच्या ताब्यात दिले आहे.
पुनर्वसू या संस्थेचे अमर गुरुंग, सुरेश खरात, संजय रणपिसे, गणेश गोपाळे या प्राणीमित्रांनी या दुर्मिळ कोल्ह्याला जीवदान दिले आहे. कोल्हा परिसरातील कुत्र्यांच्या दहशतीमुळे त्या भागात अनेक दिवसांपासून अडकला होता. तर अनेक दिवस एकाच भागात अडकून बसल्याने उपासमार होऊन त्याची प्रकृती खालावत चालली होती. अखेर बुधवारी सकाळी तो अस्वस्थ होऊन एका जागी बसला असता पुनर्वसू संस्थेच्या प्राणीमित्रांनी पकडून त्याला ठाणे वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.