कर्जतमधील रानमेवा होतोय दुर्मीळ
By admin | Published: April 6, 2016 04:14 AM2016-04-06T04:14:25+5:302016-04-06T04:14:25+5:30
गेल्या काही वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात बोरं, करवंदे, तोरणं यासारख्या फळांचा रानमेवा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत होता.
नेरळ : गेल्या काही वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात बोरं, करवंदे, तोरणं यासारख्या फळांचा रानमेवा मोठ्या प्रमाणात पहायला मिळत होता. परंतु सध्या हा रानमेवा दुर्मीळ होत आहे. लहान -थोरांना आवडणारा हा रानमेवा ठरावीक ठिकाणीच बहरताना दिसत आहे. सततच्या वणव्यांच्या घटनांमुळे येथील वनसंपदा धोक्यात आल्याने हा रानमेवा नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.
काही वर्षांपूर्वी आंबट-गोड बोरं, करवंदे, तोरणं अशा अनेक फळांची रेलचेल असायची. परंतु कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात या रानमेव्यांची झाडे कमी होत असल्याचे दिसून येत आहेत. बाजारात, चौकात, शाळेच्या बाहेर रानमेवा फळांचे विक्रे ते दिसायचे. ही फळे घेण्यासाठी शाळेची मुले मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. अलीकडे गावरान बोरांची जागा आता इलायची बोरांनी घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून झाडांची कत्तल होत असल्याने या भागात बोरं-करवंदे कमी प्रमाणात दिसत आहेत.
तालुक्यातील आदिवासी समाजातील महिल ही फळे काढून आणतात व बाजारात विकतात. परंतु खूप कष्ट करून काढलेल्या या फळांना कमी प्रमाणात भाव मिळतो. या फळांना शहरी भागात मोठी मागणी असली तरी ग्रामीण भागात मात्र या झाडांची संख्या कमी होत असल्याने ही फळे कमी प्रमाणात दिसत आहेत.