रश्मी नांदेडकर : पडद्याआडचे रक्षक पोलिसांचा खरा कणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:04 IST2025-01-16T09:04:39+5:302025-01-16T09:04:45+5:30
नवी मुंबई पोलिसांचा हाच कणा भक्कम राखण्याची जबाबदारी पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर सध्या निभावत आहेत.

रश्मी नांदेडकर : पडद्याआडचे रक्षक पोलिसांचा खरा कणा
नवी मुंबई : शहरात कोणताही गुन्हा, दुर्घटना घडली की, घटनास्थळी दिसतात ते पोलिस. संकटकाळात आठवतात तेदेखील पोलिस. त्यावरून पोलिस ठाण्यात नेहमी दिसणारे पोलिस किंवा गुन्हे शाखेचे पोलिसच प्रत्येकाच्या तोंडी चर्चेत असतात. मात्र, त्याही पलीकडचे व महत्त्वाचे कामकाज हाताळणारे मात्र नेहमी पडद्याआड राहणारे पोलिस किंचित नागरिकांना माहीत असतील. कुठल्याही चर्चेत न येता, गोपनीय कामकाज करणारी विशेष शाखेची ही यंत्रणा पोलिसांचा मुख्य कणा असतो. नवी मुंबई पोलिसांचा हाच कणा भक्कम राखण्याची जबाबदारी पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर सध्या निभावत आहेत.
वर्ष २००९च्या बॅचच्या रश्मी नांदेडकर यांनी विदर्भ, नाशिक, भंडारा, नागपूर येथे कामातून स्वतंत्र छाप उमटवल्यानंतर सध्या नवी मुंबईत कार्यरत आहेत. बहुतांश अधिकाऱ्यांना नकोशी वाटणारी विशेष शाखेची जबाबदारी नांदेडकर यांनी मात्र आनंदाने स्वीकारली. शहरात कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सभा, प्रवास होणार असल्यास त्यांच्या सुरक्षेचा पूर्णपणे गोपनीय आढावा याच विशेष शाखेकडून घेतला जातो.
८५ हजार पासपोर्टसह ७० हजार जणांची चारित्र्य पडताळणी
रोजच्या कामासोबतच मागील वर्षभरात विशेष शाखेने सुमारे ८५ हजार नागरिकांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन उरकून त्यांच्या विदेशवारीच्या स्वप्नांना पंख दिले आहेत.
शिवाय खासगी, सरकारी नोकरीसाठी धडपडणाऱ्या जवळपास ७० हजार व्यक्तींची चारित्र्य पडताळणी करून दिली आहे. यावरून त्यांच्या कामाचा व्याप दिसून येतो.
सोशल मीडियामुळे उसळणारे वाद, घातपात घडवू पाहणाऱ्या व्यक्तींचे मनसुबे उधळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचे उपक्रमही विशेष शाखेमार्फत राबवले जातात. त्यामुळे नेहमी पडद्याआड राहणाऱ्या विशेष शाखेला एकप्रकारे पोलिसांचा कणा समजले जाते.
यावर ठेवतात विशेष लक्ष
पासपोर्ट व्हेरिफिकेशन, चारित्र्य पडताळणी, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह हालचाली, सागरी सुरक्षा, महत्त्वाची ठिकाणे, विदेशी नागरिक, अशा अनेक पडद्यामागील प्रमुख जबाबदाऱ्या विशेष शाखेवर असतात. हे कामकाज पूर्णपणे गोपनीयतेवर व तांत्रिक बाबींवर चालते. त्यामुळे त्यांना ना कामाचे श्रेय मिळते, ना प्रसिद्धी.