गृहविलगीकरणाचे प्रमाणही आले निम्म्यावर, नवी मुंबईतील १,४२४ नागरिक घेत आहेत घरातच उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 09:05 AM2021-05-11T09:05:25+5:302021-05-11T09:10:15+5:30

धोकादायक ठरलेली कोरोनाची दुसरी लाट थांबविण्यासाठी महानगरपालिकेने संचारबंदी व कडक निर्बंधांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केली आहे.

The rate of Home quarantine has also halved, with 1,424 citizens in Navi Mumbai receiving treatment at home | गृहविलगीकरणाचे प्रमाणही आले निम्म्यावर, नवी मुंबईतील १,४२४ नागरिक घेत आहेत घरातच उपचार

गृहविलगीकरणाचे प्रमाणही आले निम्म्यावर, नवी मुंबईतील १,४२४ नागरिक घेत आहेत घरातच उपचार

Next

नामदेव मोरे -

नवी मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे आता गृहविलगीकरणाचे प्रमाणही निम्म्यावर आले आहे. सद्य:स्थितीमध्ये १,४२४ जण घरी उपचार घेत असून त्यामध्ये पन्नाशीच्या पुढील ३३७ जणांचा समावेश आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी ५० वर्षांवरील रुग्णांनी घरी न थांबता रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन केल्यामुळे ज्येष्ठांचे गृहविलगीकरण कमी झाले आहे.

धोकादायक ठरलेली कोरोनाची दुसरी लाट थांबविण्यासाठी महानगरपालिकेने संचारबंदी व कडक निर्बंधांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केली आहे. या उपाययोजनांना यश येत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. १५ एप्रिलला शहरात ११ हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण होते. सद्य:स्थितीमध्ये हा आकडा ३,७१४ झाला आहे. 

एप्रिलमध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर घरामध्येच उपचार करण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात झाली होती. २८ एप्रिलला शहरात ३,३६० जणांवर घरामध्ये उपचार केले जात होते. यामध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ९३३ जणांचा समावेश होता. सद्य:स्थितीमध्ये घरात उपचार घेणाऱ्यांची संख्या १,४२४ झाली असून पन्नासपेक्षा जास्त वय असणाऱ्यांची संख्या ३३७ आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. प्रतिदिन ७ ते १० जणांचा मृत्यू होत आहे. मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे विश्लेषण केल्यानंतर ८० टक्के मृत्यू ५० वर्षांपुढील रुग्णांचे असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्येष्ठ नागरिकांवर घरामध्ये उपचार सुरू असले व त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली तर मृत्यूचा धोका वाढतो. यामुळे महानगरपालिकेने पन्नाशीच्या पुढील व्यक्तींनी उपचारासाठी रुग्णालयातच जावे, असे आवाहन केले होते.

या आवाहनालाही काही प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. बारा दिवसांपूर्वी ६० वर्षांच्या पुढील ३०६ जण घरी उपचार घेत होते, आता ही संख्या १११ झाली आहे. ५० ते ६० वयोगटातील ६२७ जण घरी उपचार घेत होते. आता हे प्रमाण २२६ वर आले आहे.

पन्नास वर्षांवरील गृहविलगीकरण सुरू असलेल्या रुग्णांचा तपशील -
आरोग्य केंद्र         २८ एप्रिल          १० मे
सीबीडी                १३८              ८३
वाशीगाव             १०१            ३९
जुहूगाव            ८५            ४३
करावे             ९६             २०
सेक्टर ४८ सीवूड     ७७             २०
सानपाडा             ५८             ८
कुकशेत             ५६             १०
पावणे             ५५             ६
घणसोली             ३७             ९
नेरूळ एक        ५४             ३०
रबाळे             ३७             १९
महापे             ३६            ८
शिरवणे             ३६             ६
खैरणे             २९             १८
नेरूळ दोन        २०             ६
ऐरोली             ११             ५

खासगी डॉक्टरांनाही महानगरपालिकेचे आवाहन
nपन्नास वर्षांच्या वरील कोरोना रुग्णांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे यासाठी महानगरपालिकेने खासगी डॉक्टर व लोकप्रतिनिधींचीही मदत घेण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी मागील रविवारी ३०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला होता. सोमवारी पुन्हा ९६ नामांकित फिजिशियनशी संवाद साधला. 

- मनपाच्या टास्क फोर्सचे डॉ. उदय जाधव, अजय कुकरेजा, डॉ. अक्षण छल्लानी, आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, रत्नप्रभा चव्हाण यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. मृत्युदर कमी करण्यासाठी ५० वर्षांच्यावरील व सहव्याधी असणाऱ्या रुग्णांनी घरी थांबू नये. या सर्वांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन केले. 

- ज्येष्ठ नागरिक घरी थांबले व त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली तर मृत्यूचा धोका वाढतो. यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असून यासाठी खासगी डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

विभाग कार्यालयनिहाय गृहविलगीकरणाचा तपशील
विभाग कार्यालय        २८ एप्रिल         १० मे
बेलापूर                    १००७         ४९२
नेरूळ                 ६०७         १९७
वाशी                 ४७३         २२३
कोपरखैरणे             ३७७         १३९
ऐरोली                 ३०२             १५९
तुर्भे                     २८५         ७९
घणसोली                 २३१             १०५
दिघा                 ७८             ३०
 

Web Title: The rate of Home quarantine has also halved, with 1,424 citizens in Navi Mumbai receiving treatment at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.