डाळी, कडधान्याचे दर पाच वर्षांत दुप्पट; जीएसटीमुळे वस्तूंचे दर पुन्हा भडकणार
By नामदेव मोरे | Published: August 3, 2022 11:32 AM2022-08-03T11:32:40+5:302022-08-03T11:33:02+5:30
महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे.
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : देशभर जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. पाच वर्षांमध्ये डाळी, कडधान्याच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इंधन दरवाढ व शासनाच्या धोरणांमुळे दरवाढ होत असून, जीएसटीमुळे जीवनावश्यक
वस्तूंच्या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे.
महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. कोरोना व इतर कारणांमुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. काहींना रोजगार गमवावा लागला आहे. उत्पन्न घटले असताना खर्चामध्ये मात्र सातत्याने वाढ होऊ लागली आहे. किमान डाळी, कडधान्य व अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात असाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते. परंतु या वस्तूंवरही शासनाने जीएसटी लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईमध्ये भर पडू लागली आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबई बाजार समितीमध्ये ४० ते ४६ रुपये किलो दराने विकली जाणारी मसूरडाळ आता ८२ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात आहे. मूगडाळ ५६ ते ६२ वरून ८५ ते १०५ रुपयांवर गेली आहे. तूरडाळ, उडीदडाळीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अशीच स्थिती राहिली तर महिन्याचा घरखर्च भागविणेही मुश्कील होईल, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
पाच वर्षांमध्ये इंधनदरामध्ये झालेली वाढ व इतर कारणांनी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. शासनाने ५ टक्के जीएसटी लावल्यामुळे महागाईमध्ये अजून भर
पडली आहे.
- भीमजी भानुशाली,
सचिव ग्रोमा