नामदेव मोरे नवी मुंबई : भटकी कुत्री, डासांबरोबरच शहरवासी उंदरांमुळे त्रस्त झाले आहेत. मूषक नियंत्रणासाठी पालिकेच्या तिजोरीवरील ताणही वाढू लागला आहे. दहा वर्षांमध्ये सात कोटी ८१ लाख रुपये खर्च झाले असून २०१८-१९ या वर्षासाठी तब्बल दोन कोटी ८५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.घणसोली सेक्टर ७मधील सिंप्लॅक्स परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी कार व दुचाकींची वायर उंदरांनी कुरतडली. अशाप्रकारच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. रात्री सोसायटी आवारात उभी केलेली गाडी सकाळी सुरू झाली नाही की उंदरांनी वायर कुरतडल्या असणार, असा संवाद वारंवार ऐकू येऊ लागला आहे. शहरात गावठाण, झोपडपट्टी, बहुतांश सोसायटी आवारांत हीच स्थिती आहे. सानपाडा परिसरामधील एक कार्यालयामध्ये पाण्याच्या बॉटलपासून ते संगणकाच्या वायरपर्यंत अनेक महत्त्वाच्या वस्तू उंदरांनी कुरतडल्याच्या घटना घडल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईने आघाडी घेतली असली तरी उंदरांचा उपद्रव थांबविण्यामध्ये मात्र प्रशासनास अपयश आले आहे. पालिकेने मूषक नियंत्रणासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदार बिळे बुझविणे, सापळे बसविणे व मूषक मारण्याचे काम करत आहेत; परंतु ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या आहेत. प्रत्येक वर्षी मूषक नियंत्रणावरील खर्च वाढू लागला आहे.२००८ - ०९ या वर्षामध्ये पालिकेने १८ लाख ५८ हजार रुपये खर्च केले होते. दहा वर्षांमध्ये यामध्ये सहा पट वाढ झाली असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये यावर तब्बल एक कोटी ४६ लाख रुपये खर्च होत आहेत. प्रत्येक दिवशी उंदीर मारण्यावर तब्बल ४० हजार रुपये खर्च होऊ लागले आहेत. एवढा प्रचंड खर्च होऊनही शहरवासीयांची या त्रासातून सुटका होत नाही. मुळात उंदरांचा उपद्रव रोखण्यासाठी तक्रार कोणाकडे करायची, याची माहितीच नागरिकांना नाही. नगरसेवक प्रशासनाकडे व ठेकेदाराकडे पाठपुरावा करून मूषक नियंत्रणासाठीच्या उपाययोजना करण्यास सांगतात; परंतु त्यानंतरही प्रभावीपणे काम होत नाही. मूषक नियंत्रणाचे काम करणाºया ठेकेदारांची माहिती संकेत स्थळावरही देण्यात आलेली नाही.महापालिका प्रशासनाचेही ठेकेदाराच्या कामाकडे फारसे लक्ष नाही. तक्रारी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. रस्ते, पदपथ, इमारत बांधकाम, उद्यान व इतर कामांवर नागरिकांचे व माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे आणि नगरसेवकांचेही लक्ष असते; पण मूषक नियंत्रणाच्या कामावर फारसे लक्ष दिले जात नसल्यामुळे ते काम प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. मूषक नियंत्रणावरील वाढत्या खर्चामुळे उंदीर तिजोरीवर डल्ला मारत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.रोज ४० हजार खर्चमहापालिकेने २०१७-१८ या वर्षामध्ये मूषक नियंत्रणावर १ कोटी ४६ लाख रूपये खर्च होणार असल्याचे स्पष्ट केले असून, त्याविषयी अंदाज पत्रकामध्ये सुधारित तरतूद केली आहे. याचा अर्थ शहरामध्ये एका वर्षामध्ये मूषक नियंत्रणासाठी रोज ४० हजार रूपये खर्च महापालिकेला करावा लागत आहे. पालिकेच्या तिजोरीवरील भार प्रत्येक वर्षी वाढत आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल २ कोटी ८५ लाख रूपयांची तरतूद केली असून, एवढा खर्च झाला तर प्रतिदिन होणारा खर्च तब्बल ७८ लाखांवर जाणार आहे.
पालिकेच्या तिजोरीवर उंदरांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:06 AM