दि कराड जनता बँकेवर आरबीआयचे निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:19 AM2017-11-11T01:19:33+5:302017-11-11T01:19:35+5:30
आरबीआयने दि कराड जनता सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. यामुळे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने
नवी मुंबई : आरबीआयने दि कराड जनता सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध आणले आहेत. यामुळे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने चिंतीत झालेल्या बँक ग्राहकांनी एपीएमसी येथील शाखेत गर्दी केली होती. या वेळी सहा महिन्यांतून फक्त एकदाच एक हजार रुपये काढता येणार असल्याची माहिती खातेधारकांना देण्यात आली.
दि कराड जनता सहकारी बँकेच्या कराड येथील मुख्य शाखेतील कर्जदारांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते. यामुळे आरबीआयने दि कराड जनता सहकारी बँकेच्या सर्वच शाखांच्या व्यवहारावर निर्बंध आणले असल्याचे बँक कर्मचाºयांनी सांगितले. त्यामुळे गुरुवारी रात्री बँकेच्या सर्व शाखांना पत्र पाठवून आर्थिक व्यवहार थांबवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दि कराड जनता सहकारी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा आर्थिक व्यवहार झाला नाही. तर पैसे काढण्यासाठी अथवा खात्यात भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना धक्काच बसला. असाच प्रकार एपीएमसी दाणाबंदर येथील शाखेत गेलेल्या माथाडी कामगारांसोबत घडला. काही कामगार बँकेत गेले असता, त्यांना खात्यातून रक्कम काढता अथवा भरता येणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, यासंबंधीचे कारण त्यांनी विचारले असता, बँक कर्मचाºयांकडून ठोस उत्तर मिळाले नाही. अखेर बँकग्राहकांनी त्यांच्या इतर परिचयाच्या बँक ग्राहकांना यासंबंधीची माहिती दिली. परिणामी, दुपारपर्यंत मोठ्या संख्येने बँकेत खातेधारकांची गर्दी झाली होती; परंतु त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी बँकेचे कोणीही जबाबदार अधिकारी नव्हते. यामुळे बँकेच्या खातेधारकांमध्ये नाराजी पसरली होती. दुपारनंतर मात्र बँकेतून प्रत्येक ग्राहकाला खात्यातून एक हजार रुपये काढण्यास अनुमती असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सहा महिन्यांतून एकदाच एक हजार रुपये काढता येणार असल्याचे समजताच ग्राहकांमध्ये असंतोष पसरला. अनेकांच्या पगाराची रक्कम सदर बँक खात्यात जमा होत असून, काहींचे लाखो रुपये सदर बँकेच्या खात्यात जमा आहेत. अशा व्यक्तींपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आरबीआयचे बँकेवर आलेल्या निर्बंधासंदर्भात दोन दिवसांत बँकेची बैठक होणार असल्याचे समजते. त्यामध्ये ठरावीक शाखांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.