खारघरमधील रिक्षाचालकांना आरटीओची कारणे दाखवा नोटीस, २० दिवसांपासून रिक्षा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:22 AM2017-12-09T02:22:20+5:302017-12-09T02:22:33+5:30
खारघर शहरात गेल्या २० दिवसांपासून तळोजा व खारघर येथील संघटनेच्या वादामुळे एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत.
पनवेल : खारघर शहरात गेल्या २० दिवसांपासून तळोजा व खारघर येथील संघटनेच्या वादामुळे एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत. या प्रकरणात प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ७२ रिक्षा चालकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. परवाने का रद्द करू नयेत? असा प्रश्न या नोटीसमध्ये रिक्षा चालकांना विचारण्यात आला आहे.
खारघर शहरात एकता रिक्षा संघटनेच्या माध्यमातून १६ वर्षांपासून शेकडो रिक्षा चालक याठिकाणी व्यवसाय करीत आहेत. या संघटनेचे ८०० पेक्षा जास्त रिक्षाचालक शहरात व्यवसाय करीत आहेत . मात्र, अचानक तळोजा येथील रिक्षा संघटनेने शहरातील विविध रिक्षा थांब्यांवर ताबा मिळविला असल्याचा आरोप एकता रिक्षा संघटनेने केला आहे. याच कारणावरून दोन्ही संघटनेच्या पदाधिकाºयांमध्ये हाणामारी झाली होती.
या प्रकरणानंतर एकता रिक्षा संघटनेने आपल्या रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर उपासमारीची वेळ येत असल्याने तळोजा येथील रिक्षाचालकांना आवरा, अशी या रिक्षाचालकांची मागणी आहे. या प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक पोलीस आयुक्त, आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील बैठक घेतली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तोडगा निघाला नाही. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी शुक्रवारी खारघरमधील रिक्षा चालकांना नोटिसा बजावल्या आहेत.