सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आरसीसी चेंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:42 AM2019-06-03T00:42:34+5:302019-06-03T00:42:43+5:30
खांदा वसाहतीतील रहिवाशांना दिलासा : डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत
कळंबोली : खांदा वसाहतीत सांडपाण्याचा निचरा करणारे बहुतांश जुने चेंबर तुटले आहेत, त्यामुळे वाहिन्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर तसेच सोसायट्याच्या आवारात साचत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्यावर मलनि:सारण पंपहाउस जवळील तुटलेले चेंबर काढून टाकून त्या ठिकाणी आरसीसी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
खांदा वसाहत सिडकोने विकसित केली. या नोडमध्ये एकूण १४ सेक्टर आहेत. नोडमधील मलमिश्रीत सांडपाणी खांदेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या पंपहाउसमध्ये येते. येथून ते कामोठे येथील मलनि:सारण केंद्राकडे पाठवले जाते. सेक्टर ४, ६, ८, ९ येथील मलमिश्रीत सांडपाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेला चेंबर जुनाट झाल्याने तुटला होता. त्यामुळे परिसरात वारंवार सांडपाणी वाहिन्या तुंबत होत्या. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी सिडकोकडे केली होती. त्यानुसार सिडकोने आरसीसी चेंबर बांधण्यास सुरुवात केली असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.
बॅकवॉटरचा त्रास कमी होणार
मलनि:सारण वाहिन्या तुंबल्याने हे बॅकवॉटर खांदा वसाहतीतील एका सोसायटीत येत होते. त्यामुळे तळमजल्याच्या घरातील शौचालयातून सांडपाणी वर येत होते. पाणी झिरपून भिंतींना ओल आल्याने इमारतीची दैना झाली होती. याबाबत पत्रव्यवहार केल्यावर सिडकोकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या.
२० फूट खोल आरसीसी चेंबर
पंपहाउस जवळ असलेला चेंबरचे काम सिडकोने हाती घेतले आहे. हा चेंबर २० फूट खोल आहे. दोन मीटर रुंदी असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर पंपहाउसची जाळी साफ करून घेण्यात आली आहे.
पंपहाउस जवळील चेंबर जुने आणि आकाराने लहान असल्याने तुंबत होते. चेंबरमध्ये उतरून कामेही करता येत नव्हती. येत्या पावसाळ्यात रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून नवीन आरसीसी चेंबर बांधकाम करण्यात येत आहे. - व्ही. एल. कांबळी कार्यकारी अभियंता, सिडको