नवी मुंबईत पुन्हा निवडणुकांचे वेध; इच्छूक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:32 AM2020-08-25T00:32:53+5:302020-08-25T00:33:23+5:30
नेत्यांनी अहवाल मागविले; सुरक्षेविषयी चाचपणी सुरू
नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागताच नवी मुंबईकरांनाही महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. नेत्यांनी पदाधिकाऱ्यांकडून केलेल्या कामांचे अहवाल मागविण्यास सुरवात केली आहे. इच्छूक उमेदवारांचा मतदारांशी संपर्क पुन्हा वाढू लागला असून प्रशासकिय स्तरावरही सुरक्षेविषयी चाचपणी सुरू झाली आहे. दिवाळीच्या दरम्यान निवडणुकांचे फटाके फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची पंचवार्षीक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षीत होते. त्यासाठी निवडणूक विभागाने कार्यवाही सुरूही केली होती. १७ डिसेंबर २०१९ ला सर्वप्रथम आरक्षण सोडत काढली जाणार होती. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध असल्यामुळे ती रद्द करण्यात आली. १ फेब्रुवारीला एक प्रभाग पद्धतीप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले. ९ मार्चला प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या. १६ मार्चला हरकती मागविण्यात आल्या. परंतु देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे १७ मार्चला निवडणूक विभागाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकाही अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे निवडणूका नक्की कधी होणार हे अनिश्चीत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. दिवाळीच्या दरम्यान निवडणूकांचे फटाकेही फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकिय पक्षांच्या त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून शिवसेना पदाधिकाऱ्यांना फोन करण्यात येत होते. कोरोनाच्या काळात केलेल्या कामांची माहिती मागविण्यात आली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी अहवाल तयार करायचा असून त्यासाठी ही माहिती हवी असल्याचेही सांगितले जात होते.
शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही उपक्रम वाढले आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईचा देशात पहिला क्रमांक आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाºयांनी प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता कर्मचाºयांचा सत्कार केला आहे. एकाच वेळी सर्व ठिकाणी हा कार्यक्रम झाला. भाजपचे काही नेते शिवसेनेच्या नाराज पदाधिकाºयांच्याही संपर्कात असून कोरोनाच्या काळात त्यांची आस्थेने विचारपूस केल्याची चर्चाही सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून आलेले निरोप व माजी पालकमंत्र्यांच्या समर्थकांकडून सुरू झालेले उपक्रम हे निवडणूका लवकरच होणार असल्याचे संकेत देऊ लागले आहेत. सप्टेंबरमध्ये मतदार याद्या तयार करण्याचे व त्यांच्यावर सुचना हरकती घेतल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कधीपर्यंत आटोक्यात येईल याविषयी आढावाव घेतला जात आहे. निवडणुकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी उपाययोजनाही करण्यात येणार आहेत. सभा, बैठका, मेळावे यासाठी सुधारीत नियमावल तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे समिकरणे बदलली
महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकिय पक्षांनी कंबर कसली होती. भारतीय जनता पक्षाने राज्य कार्यकारीणीची बैठक घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्याची घोषणाही केली होती. महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकाही सुरू झाल्या होत्या. शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबईत ठाण मांडण्यास सुरवात केली होती. परंतु कोरोनामुळे सर्वच समिकरणे बदलली आहेत. इच्छूक उमेदवारांची आर्थीक समिकरणे बिघडली आहेत. निवडणूका जेवढ्या लांबणार तेवढा मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी खर्चही वाढणार आहे. यामुळे लवकर निवडणूका व्हाव्यात असे मत अनेक कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
कोरोनाच्या स्थितीचा आढावा : शासनाकडून नवी मुंबईमधील कोरोनाच्या स्थितीचा नियमीत आढावा घेतला जात आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून कोरोनाविषयी सुरू असलेल्या उपाययोजना व सद्यस्थिती यांचा आढावा घेतला आहे. कधीपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल याचा अंदाज शासनही घेत असून त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीविषयी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
एपीएमसीपासून सुरवात : महानगरपालिका निवडणुकीची चाचपणी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती पदाच्या निवडणुकीपासूनच होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे सभापतीपदाची निवडणूकही पुढे ढकलल्यात आली होती. ३१ आॅगस्टला सभापती व उपसभापतीपदाची निवड केली जाणार आहे. एपीएमसीपासून निवडणूकांची सुरवात होणार असून त्यानंतर मनपा निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.