पूरस्थिती निवारण्यासाठी नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
By नारायण जाधव | Published: July 8, 2024 06:27 PM2024-07-08T18:27:58+5:302024-07-08T18:28:15+5:30
तुम्ही निसर्गावर आक्रमण करतात तेव्हा त्यापेक्षा अधिक वेगाने निसर्ग त्याची परतफेड करतो, असे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
नवी मुंबई : गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शहापूर, कल्याण, बदलापूर, पनवेल, कळंबोली परिसरात नद्यांना आलेल्या पुरामुळे पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
महाराष्ट्र सरकारने मूठभर उद्योजक आणि बिल्डरांच्या हितासाठी नदी नियामक क्षेत्राचे बंधन २०१५ मध्ये मोडीत काढल्यानेच हे नुकसान झाले आहे. यामुळे नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
पनेवल, कळंबोली आणि शहापूर, बदलापूर परिसरात नद्यांच्या पुराचे पाणी शहरांमध्ये शिरल्यानंतर नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनने तातडीने पत्र लिहून नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली आहे.
नदी नियामक क्षेत्र रद्द केल्यानंतर बदलापूर, शीळ फाटा आणि चिपळूणमधील पूरस्थितीनंतर नदीकाठावरील विकास निर्बंध सौम्य करण्याबाबत आम्ही सरकारला इशारा दिला आहे, तरीही अधिकारी धडा शिकताना दिसत नाहीत. तुम्ही निसर्गावर आक्रमण करतात तेव्हा त्यापेक्षा अधिक वेगाने निसर्ग त्याची परतफेड करतो, असे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.