नवी मुंबई विमानतळाहून ३० मिनिटांत गाठा मुंबई; सिडकोच्या मेट्रोचा मानखुर्दपर्यंत विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 10:20 AM2023-04-30T10:20:19+5:302023-04-30T10:20:32+5:30
विशेष म्हणजे राज्य शासनाने सिडकोच्या मानखुर्दपर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे.
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने दळणवळणाच्या सक्षम यंत्रणांवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण नवी मुंबईत मेट्रोचे चार मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यांपैकी बेलापूर ते पेंधर हा ११ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा वाहतुकीस सज्ज झाला आहे. या मार्गाचा पुढे मानखुर्दपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. तसेच नवी मुंबई विमानतळास कल्याण-तळोजा मेट्रो मार्गास जोडण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे राज्य शासनाने सिडकोच्या मानखुर्दपर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने अर्बन मास ट्रान्सिट कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील पाच महिन्यांत ही कंपनी आपला अहवाल सादर करणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
बेलापूर ते मानखुर्द हा मार्ग १४ किलोमीटर लांबीचा असून, तो थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. या मार्गावर नवी मुंबईत वाशी, सानपाडा, जुईनगर आणि सागरसंगम अशी स्थानके असणार आहेत; तर दक्षिण नवी मुंबईतील खांदेश्वर येथून आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोची जोड दिली जाणार आहे. प्रस्तावित बेलापूर ते मानखुर्द हा मार्ग एमएमआरडीएने उभारलेल्या मेट्रो-८ ला जोडणार आहे. मेट्रोचा मार्ग क्रमांक ८ हा थेट मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला गेला आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास अवघ्या ३० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. प्रवाशांच्यादृष्टीने हे खूपच फायदेशीर ठारणार आहे.
मेट्रो प्रकल्पासाठी ४,९२७ कोटी खर्च
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून दळणवळणाच्या अद्ययावत सुविधा विकसित केल्या जात आहेत. त्यानुसार विमानतळ क्षेत्रातील प्रमुख वसाहतींना जोडण्यासाठी मेट्रोचे २६.७६ किलोमीटर लांबीचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. चार टप्प्यांत प्रस्तावित असलेल्या या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे; तर उर्वरित तीन टप्प्यांच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. या तीन टप्प्यांत मेट्रो निओ ही स्वस्त आणि सुरक्षित सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ४९२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यांपैकी पहिल्या टप्प्यासाठी ३०६३ कोटी रुपये खर्च केले आहेत.
कल्याणच्या प्रवाशांना थेट विमानतळ गाठता येणार
एमएमआरडीएचा कल्याण-तळोजा मेट्रो-१२ प्रकल्पाचे कामसुद्धा प्रगतिपथावर आहे. हा मार्ग तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वरमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. मेट्रो १२ प्रकल्पात सिडको क्षेत्रात केवळ चार कि.मी. लांबीचा समावेश आहे. या मार्गामुळे डोंबिवली, कल्याणच्या प्रवाशांना थेट विमानतळ गाठता येणार आहे.