अलिबाग : रायगड जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांच्या मतमोजणीकरिता १५ तालुक्यांच्या ठिकाणी निवडणूक मतमोजणी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली आहे. मतमोजणी गुरुवारी सकाळी १० वाजता सुरु होणार आहे.रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत गुरुवारी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ८ मार्च २०१७ रात्री १२ वाजेपर्यंत रायगडचे अपर जिल्हादंडाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) मनाई आदेश जारी केला असल्याने, कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस बंदी राहाणार आहे. यामुळे विजयी उमेदवारांच्या आनंदोत्सव मिरवणुकीवर मात्र विरजण पडणार आहे. २४ फेब्रुवारी रोजीचा महाशिवरात्री उत्सव, जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी सुरु असलेली आंदोलने या कारणास्तव हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणुका आदि कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना दिले आहेत. (विशेष प्रतिनिधी)१३९ एसटी निवडणूक यंत्रणेच्या सेवेतअलिबाग : रायगड जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाकरिता निवडणूक यंत्रणेस मतदान यंत्रे व सामग्रीसह मतदान केंद्रांवर घेऊन जाणे आणि मतदानानंतर पुन्हा मतमोजणी केंद्रावर आणून पोहोच करणे, यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध आगारांतील एकूण १३९ एसटी कामाला लावल्या होत्या. याबाबतची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या रामवाडी (पेण) विभागीय कार्यालयातील वाहतूक नियंत्रक संजय हर्डीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रायगड जिल्ह्यातील अलिबाग आगारातून ३०, माणगाव आगारातून २६, महाड २२, श्रीवर्धन १५, रोहा १७, कर्जत १३, पेण ९, तर मुरूड ७ अशा एकूण १३९ एसटी निवडणूक यंत्रणेच्या सेवेसाठी दिल्या होत्या. तर मंगळवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याच १३९ एसटी बसेसच्या माध्यमातून निवडणूक अधिकारी, कर्मचारी, मतदान यंत्रे व सामग्री संबंधित मतमोजणी केंद्रांवर आणून पोहोच करण्याचे काम केले आहे. या दोन दिवसांच्या सेवेदरम्यान १३९ एसटींनी ही सेवा विनाव्यत्यय दिली असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.एका एसटीचे प्रतिदिन सुमारे १० हजार रुपये भाडे निवडणूक आयोगाकडून प्राप्त होईल. जिल्हा परिषद निवडणुकीकरिता दोन दिवस वापरण्यात आलेल्या १३९ एसटीचे एकूण सुमारे २ लाख ७८ हजार रुपयांचे भाडे एसटीला प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
मतमोजणीकरिता यंत्रणा सज्ज
By admin | Published: February 23, 2017 6:19 AM