निवडणूक यंत्रणा सज्ज, कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:51 AM2019-04-28T01:51:11+5:302019-04-28T01:51:31+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे.
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्यानंतर निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचालींना गती मिळाली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी सर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहोचणार आहेत, यानुसार त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी ऐरोली विधानसभा क्षेत्रात ७१ केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यामधील ४५२ बूथवर मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक बूथवर एक हजार ते १२०० मतदारांचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र, अनेक बूथवरील मतदारांचा आकडा दीड हजारांच्या वर जात आहे. त्यामुळे मूळ ४३३ बूथमध्ये अधिक १९ बूथची भर पडलेली आहे. त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या कर्मचाऱ्यांना ऐरोलीतील सरस्वती विद्यालयाच्या आवारातून निश्चित मतदान केंद्राकडे पोलीस सुरक्षेत मतपेट्यांसह रविवारी सकाळी रवाना केले जाणार आहे.
त्यानुसार शनिवारी रात्रीपासूनच सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीभोवती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान कर्मचाºयांवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ नये, या उद्देशाने त्यांच्या वाहनांमध्ये जीपीएस बसवण्यात आले आहेत. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाºयाच्या वापरासाठी असलेल्या कारसह कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या बसचाही समावेश आहे.
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी दुपारी ऐरोली विधानसभा क्षेत्रातील या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. या दरम्यान निवडणूक अधिकारी नीलिमा सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर टेबल-खुर्चींसह इतर आवश्यक साहित्य पुरवण्यात आले असून, काही ठिकाणी मतदारांना सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. महिन्याभरात अनेक कोम्बिंग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सराईत गुन्हेगारांना तडीपार करणे, अवैध शस्त्र जप्ती अशा कारवाया केल्या आहेत. मतदानाच्या दिवशीही शहरात चोख बंदोबस्त राहणार आहे.
मतदान केंद्राच्या आवारात १०० मीटरवर प्रवेशबंदी घातली जाणार आहे. त्या ठिकाणी केवळ निवडणूक अधिकारी व कर्मचारी, मतदार, उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी गस्ती पथकेही सक्रिय राहणार आहेत.