टेक ऑफसाठी सज्ज... नवी मुंबई! दोन दशकांपासून पाहिलेलं स्वप्न येणार सत्यात
By नारायण जाधव | Published: June 12, 2023 03:44 PM2023-06-12T15:44:26+5:302023-06-12T15:44:39+5:30
गेल्या दोन दशकांपासून नवी मुंबईकरांनी पाहिलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सत्यात उतरणार आहे.
नारायण जाधव
गेल्या दोन दशकांपासून नवी मुंबईकरांनी पाहिलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर सत्यात उतरणार आहे. सिडकोसह ‘जीव्हीके’ आणि आता ‘अदानी समूहा’ने घेतलेली मेहनत व त्यांना महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने दिलेली साथ, भूसंपादनासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी केलेल्या त्यागामुळे विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे डिसेंबर २०२४ पर्यंत येथून पहिल्या विमानाचे उड्डाण होईलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जून रोजी विमानतळाची कामाची पाहणी केल्यानंतर व्यक्त केला. सर्व परवानग्या तत्काळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन आग्रही असल्याची ग्वाही उभयतांनी दिल्याने ‘सिडको’ आणि ‘अदानी समूहा’चा विश्वास दुणावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ फेब्रुवारी २०१८ रोजी विमानतळाची पायाभरणी केली. नंतर २०२१ च्या सुरुवातीला विमानतळाच्या उभारणीत अडथळा असलेल्या टेकडीचे सपाटीकरण, उलवे नदीचा प्रवाह वळविण्याच्या कामांसह मुख्य धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीच्या कामाने वेग पकडला. खरंतर १९९० च्या दशकात ‘सिडको’ने सर्वप्रथम नवी मुंबईत आंतरदेशीय विमानतळ उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कार्गो आणि टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाहतुकीचा ताण पडू लागल्याने मग कालांतराने नवी मुंबईचे नियोजित विमानतळ आंतरराष्ट्रीय करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार कामाला सुरुवात केली. त्यानुसार या विमानतळावर मोठमोठी विमाने उतरावीत म्हणून त्याचा एरोड्रोम कोड ४ एफ करून त्यासाठी डिझाइन तयार करून मग पर्यावरण, वनविभागासह इतर परवानग्यांसह भूसंपादनाला सुुरुवात केली. यात बराच कालावधी लोटल्याने खर्चही वाढला; परंतु या सर्वांवर मात करून अखेर विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली.
अशी आहे भागीदारी
- सुरुवातीला ‘जीव्हीके’ विमानतळ विकास कंपनीने फेब्रुवारी २०१७ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी बोली जिंकली.
- यात ‘जीव्हीके’चा हिस्सा ७४ टक्के, सिडको १३ टक्के आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण १३ टक्के मालकी होती.
- नंतर सप्टेंबर २०२० मध्ये ‘अदानी समूहा’ने ‘जीव्हीके’चा हिस्सा विकत घेऊन भांडवल उभे करण्यासाठी ‘एसबीआय’सोबत करार केला.
- त्यानंतर विमानतळाचे बांधकाम सुरू करून डिसेंबर २०२४ मध्ये येथून कोणत्याही परिस्थितीत विमानाचे उड्डाण करण्याचा ध्यास सिडको-अदानी समूहाने घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २२ किलोमीटरचा सीलिंक, रेवस-कंरजा ब्रीज महत्त्वाचा दुवा ठरेल.
- दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होणार असून, याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
- पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून, ४२ विमाने उभी राहतील.
- ५,५०० क्षमतेचे कार पार्किंग राहणार असून, ११.४ किलोमीटर परिसरात दोन धावपट्ट्या उभारण्यात येत आहेत.
- क्षेत्र- १,१६० हेक्टर
- अंदाजे खर्च- १६,७०० कोटी
- अंतिम मुदत- २०२४ (फेज १ च्या ऑपरेशनची सुरुवात)
- नोडल एजन्सी- सिडको
- ऑपरेटर- नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड
- आर्किटेक्ट- झाहा हदीद आर्किटेक्ट
- नागरी बांधकाम कंत्राटदार- लार्सन अँड टुब्रो