आयुक्तांसमोर खरे आव्हान संवादाचे
By Admin | Published: March 30, 2017 06:59 AM2017-03-30T06:59:37+5:302017-03-30T06:59:37+5:30
पालिका आयुक्त एन. रामास्वामी ३० मार्चपासून नियमित कामकाजाला सुरुवात करत आहेत. मागील वर्षभरामध्ये प्रशासन
नामदेव मोरे / नवी मुंबई
पालिका आयुक्त एन. रामास्वामी ३० मार्चपासून नियमित कामकाजाला सुरुवात करत आहेत. मागील वर्षभरामध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये थांबलेला संवाद पुन्हा सुरू करण्याचे खरे आव्हान त्यांच्यासमोर आहे. थांबलेला संवाद व भांडणामुळे जवळपास ११ महिन्यांत एकही महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. राजकारण्यांना फारसे न दुखवता व त्यांच्या अनावश्यक दबावाला झुगारून रखडलेला विकास पूर्ववत सुरू करण्यासाठी ते नक्की काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्तव्यनिष्ठ आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडून शहरवासीयांच्या कमालीच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पालिकेच्या कामकाजामधील राजकीय हस्तक्षेप जवळपास पूर्णपणे थांबला होता. अधिकाऱ्यांचा गौरव ते व्हाइट हाऊसपर्यंतचा प्रवासही थांबविला. अधिकारी, कर्मचारी वेळेत येऊ लागले. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली. अतिक्रमणांविरोधात कारवाईला वेग आला. पालिकेचे कामकाज गतिमान झाले. पुढील काही दिवसांमध्ये नगरसेवकांसह महापौर व इतर लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. आमदार मंदा म्हात्रे यांनी उघडपणे त्यांच्याविरोधात आवाज उठविला, नंतर टप्प्याटप्प्याने सर्वांनीच आवाज उठविण्यास सुरुवात केली. मंदा म्हात्रे यांनी जुळवून घेतले, तरी इतर सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली. यामध्ये त्यांची बदली झाली हे सर्वांनाच माहिती असले, तरी खऱ्या अर्थाने या वादाचा परिणाम शहरातील विकासकामांवर झाला. मेमध्ये मुंढे यांनी पदभार स्वीकारला व जून अखेर त्यांच्याविरोधात मोहीम सुरू झाली. मुंढे नगरसेवकांना योग्य वागणूक देत नसल्याने नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनाचे प्रस्ताव अडविण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरीच मिळाली नाही. मुंढे यांच्या विकासाच्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकल्या नाहीत.
महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये योग्य संवाद असला, तरच विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. लोकप्रतिनिधींना डावलले, तर ते त्यांचा अधिकार वापरून प्रशासनाचे प्रस्ताव अडवू शकतात, हे सर्वपक्षीय नगरसेवकांनी दाखवून दिले. ११ महिन्यांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ अभियानात सहभागी होणे. ईटीसी उपकेंद्र सुरू करणे व सर्वात महत्त्वाचे लिडार पद्धतीचा वापर करून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. याशिवाय शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. एकही महत्त्वाचा प्रस्ताव या कालावधीमध्ये मंजूर होऊ शकला नाही. येणाऱ्या काळात शहराचा विकास व्हायचा असेल, तर लोकप्रतिनिधी, आयुक्त व अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा संवाद निर्माण करावा लागणार आहे. एन. रामास्वामी हे सर्व कसे करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
डॉ. रामास्वामी एन यांचा सत्कार
महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्वागत करण्यात आले. सभागृहनेत्यांनी स्वागतपर प्रस्ताव मांडून त्याला अनुमोदन देत सभागृहात आयुक्तांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. रामस्वामी यांची २७ मार्चला नियुक्ती झाली असून, दुसऱ्याच दिवशी सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. रेडिरेकनरच्या कामामुळे त्यांना या सभेत पूर्णवेळ बसता येणार नसल्याने दिलगिरी व्यक्त करण्यात आली. शहरातील विकासकामे हाती घेऊन ती मार्गी लावण्याचे प्रतिपादन आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी केले. या शहराचा संपूर्ण अभ्यास करून योग्य कामे हाती घेतली जातील, अशी प्रतिक्रि या आयुक्तांनी दिली. या वेळी नियमानुसार प्रगतशील कामे करण्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. या वेळी महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, सभागृहनेते जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर, भारतीय जनता पार्टी पक्षप्रतोद रामचंद्र घरत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांचे स्वागत केले.
नवी आयुक्तांसमोरील आव्हाने
लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामधील थांबलेला संवाद पुन्हा सुरू करणे
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांचा अनावश्यक दबाव झुगारून काम करणे
प्रतिनियुक्ती व पालिकेत कार्यरत अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय
शहरातील अनधिकृत बांधकाम व फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे
शहराचा विकास आराखडा लवकरात लवकर बनविण्यास प्राधान्य
पालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे सविस्तर सर्वेक्षण करणे
मुंढे यांच्या कार्यकाळात मंजुरी न मिळालेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळविणे
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बदनाम झालेल्या पालिकेची प्रतिमा सुधारणे
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत सर्व साहित्य व सुविधा मिळवून देणे
मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे
ढासळलेल्या आरोग्य यंत्रणेला पूर्वपदावर घेऊन येणे
फेरीवाला व जाहिरात धोरणाला मंजुरी मिळविणे