नवी मुंबई: "मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आमदार, खासदार, शिवसैनिकांना भेटले नाहीत. प्रश्न सोडविले नाहीत. यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली. त्यांच्याकडे खोके, ओके, गद्दार, खंजीर यापुढे शब्द नाहीत. शिवसैनिकांना खोकी देऊन विकत घेणारा जन्माला यायचा आहे," असे मत बंदरे आणि खनिज मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील ऐरोली येथे हिंदूगर्वगर्जना शिवसेना संपर्क यात्रेचे आयोजन केले होते. यावेळेस दादा भुसे यांनी नवीन सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. "शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई दिली जात आहे. नवी मुंबईत मोडकळीस आलेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टी वासीयांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना भेटले नाहीत. वर्षा निवासस्थान सामान्यांसाठी बंदच होते. आत्ता संपर्क यात्रा, मेळाव्यासाठी फिरताहेत. त्यापैकी दहा टक्के तेव्हा फिरले असते तरी ही वेळ आली नसती. शिवसेनाप्रमुख महापुरुष आहेत. ते एका कुटुंबाची मालकी नाहीत. त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढावा व मग जनतेत जावे," असेही त्यांनी सुनावले. त्यांना खोके, ओके, गद्दार, खंजीर या पलीकडे बोलता येत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले म्हणाले शिवसेनेचा नवी मुंबई चा बालेकिल्ला भक्कम राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढविणार. "माजी मुख्यमंत्री अडीच वर्षात घरातून बाहेर पडले नाहीत. एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकांमध्ये मिसळणारे मुख्यमंत्री आहेत. गद्दार म्हणाणऱ्यांकडे दुर्लक्ष करा. तेच गद्दार आहे. अडीच वर्षात कधीच शिवसैनिकांना भेटले नाहीत," असा आरोप शिवसाना उपनेते विजय नाहटा यांनी केले. उपनेत्या शितल म्हात्रे, संध्या वडावकर यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टीका केली.
मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना मदतमुंबई मधील शिवशंभू गोविंदा पथकातील संदेश दळवी यांचा मृत्यू झाला होता त्याच्या कुटुंबीयांना नवी मुंबई मधील शिवसेनेचे माजी विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांच्या वतीने एक लाख रूपयांची मदत केली.