कमलाकर कांबळे , नवी मुंबईमागील दीड वर्षात सिडकोने कारवाई करून अतिक्रमणमुक्त केलेल्या बहुतांशी भूखंडांवर पुन्हा बेकायदा बांधकामे उभारली आहेत. कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या या भूखंडांना कुंपण घालून संरक्षित करण्यात संबधित विभाग अपयशी ठरल्याने भूमाफियांचे फावले आहे. अनेक ठिकाणी अर्धवट कारवाई केलेल्या अनधिकृत इमारती पुन्हा उभारल्याचे पाहवयास मिळते.नवी मुंबईतील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांत सिडकोच्या दुर्लक्षपणामुळे या जमिनी भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. सिडकोच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.मागील दीड दशकात या अतिक्रमणांना आळा घालण्यात सिडको सपशेल अपयशी ठरली आहे. असे असले तरी गेल्या दीड-दोन वर्षांपासून सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षात तर ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली. त्यामुळे जून २0१५ नंतर आतापर्यंत नवी मुंबईसह उरण आणि पनवेल तालुक्यातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करून तब्बल ६४ हजार २0७ चौरस मीटर म्हणजेच १६ एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. त्याअगोदर म्हणजेच २0१४ मध्ये एकूण ३१ हजार ३४५ चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण हटवून ती ताब्यात घेतली आहे. सध्याच्या मार्केट दरानुसार या संपूर्ण जागेची किंमत ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. सिडकोच्या मालकीच्या आणखी शेकडो एकर जमिनीवर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. टप्प्याटप्प्याने ही सर्व बांधकामे जमीनदोस्त करून अतिक्रमित जागा ताब्यात घेण्याची योजना सिडकोची योजना आहे. त्यानुसार सिडकोच्या संबधित विभागाने गेल्या आठवड्यात दुसऱ्या टप्यातील १२७ अनधिकृत बांधकामांची यादी जाहिर केली आहे. असे असले तरी कारवाईनंतर मोकळे झालेले भूखंड सरंक्षित करण्यात संबधित विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्याच जागेवर पुन्हा बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. त्यामुळे कारवाईसाठी सिडकोच्या माध्यमातून केला जाणारा लाखो रूपयांचा खर्च वाया जात आहे.
अतिक्रमणमुक्त जागांवर पुन्हा बांधकामे
By admin | Published: September 12, 2016 3:31 AM