पाण्याअभावी हाल

By admin | Published: April 21, 2017 12:26 AM2017-04-21T00:26:15+5:302017-04-21T00:26:15+5:30

मागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी

Recent | पाण्याअभावी हाल

पाण्याअभावी हाल

Next

मिलिंद अष्टिवकर,  रोहा
मागील सहा वर्षांपासून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवा व डावा या दोन्ही तीरांवरील कालव्यांना पाणी सोडले जात नाही. पाण्याअभावी शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. मागील सहा वर्षांपासून कालव्याला पाणी नसल्याने दुबार शेती इतिहासजमा झाली आहे, तर आता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकंदरीत कालव्याकाठी आमचे गाव, पाण्यासाठी धावाधाव अशीच काहीशी बिकट अवस्था रोहे तालुक्यातील बाहे, सांगडे, उडदवणे, मुठवली, मालसई, धामणसई, गावठण, सोनगाव, वांदोली, मढाली, पिंगळसई तसेच या विभागातील आदिवासीवाडी, ठाकूरवाडी आदी भागातील जनतेची झाली आहे.
संतप्त ग्रामस्थांनी प्रांतअधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती व पाटबंधारे विभागातील कार्यालयातील प्रमुखांना १८ एप्रिलला निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले व दोन-तीन दिवसांत कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली होती. मात्र या घटनेला दोन दिवस झाले तरी अद्याप दखल घेण्यात आली नाही. रोहे तालुक्यातील डोंगर दुर्गम भागातील ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. या ग्रामीण भागात तीन-चार दिवसाआड पिण्यासाठी केवळ ३ ते ४ हंडे पाणी मिळत असल्याने पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी या पाणी समस्येकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रोहा तालुक्यातील सोनगाव येथील सोमेश्वर मंदिर येथे पंचक्रोेशीतील संतप्त ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी बैठक घेऊन विभागातील समस्यांचा पाढा वाचला. या बैठकीत विशेषत: पाण्याचा मुद्दा प्रमुख्याने गाजला. कालव्याला पाणी नसल्याने पंचक्रोशीतील पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामस्थांना फक्त एक ते दोन हंडे एवढेच पाणी मिळत आहे. ग्रामस्थांबरोबर गुरांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी विपुल पशुसंपत्ती व दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना आधार मिळत असे, परंतु पाण्याअभावी हे व्यवसाय बंद झाले आहेत. शेतीत पीक नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गावात गुरांसाठी कुंडलिकेचे पाणी भाड्याच्या टेम्पोने आणावे लागत आहे, तर कपडे धुण्यासाठी महिलांना चार ते पाच कि.मी. पायपीट करून कुंडलिका नदीवर हेलपाटे मारावे लागत आहेत.
धामणसई पंचक्रोशीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यान्वित झाली, परंतु कालव्याला पाणी नसल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मागील सहा वर्षे येथील कालव्याला पाणी येत नसल्याने शेतजमीन ओसाड पडली आहे. त्यातच दुबार पीक इतिहासजमा झाले आहे. दरवर्षी दुबार पीक घेऊन उदरनिर्वाह करणारा शेतकरी आता मात्र शेतजमीन वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहे. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात जमीन बिल्डरांना विकली आहे. या सुपीक जमिनीवर एकेकाळी पीक घेणारे शेतकरी आता मात्र स्वत:ला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून संघर्ष करीत आहे. अशी भयानक अवस्था येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची झाली आहे. पाण्यासाठी लढा देणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांबद्दल सरकारला सहानुभूतीचा पाझर फुटणार कधी या प्रतीक्षेत हजारो ग्रामस्थ आहेत.

Web Title: Recent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.