वाशीतील तीन पादचारी पुलांची पुनर्बांधणी; ४ कोटी ७६ लाख खर्च
By नामदेव मोरे | Published: August 29, 2023 06:56 PM2023-08-29T18:56:33+5:302023-08-29T18:57:19+5:30
पामबीच रोड व वाशी परिसरातील तीन पादचारी पुलांची दुरावस्था झाली आहे.
नवी मुंबई : पामबीच रोड व वाशी परिसरातील तीन पादचारी पुलांची दुरावस्था झाली आहे. गंजलेल्या पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी जवळपास ४ कोटी ७६ लाख रुपये खर्च होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय थांबणार आहे.
वाशी सेक्टर १४ व १५ वरून पामबीच रोडवर येण्यासाठी नाल्यावर पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. एपीएमसी, सत्रा प्लाझा परिसराकडे ये - जा करण्यासाठी परिसरातील नागरिक या पुलाचा वापर करतात. या पुलांचे लोखंड गंजले आहे. पुलांची दुरावस्था झाल्यामुळे ते हटवून नवीन पुल बांधण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी केली होती. यापुर्वी वाशी सागर विहार परिसरातील होल्डींग पाँडला जोणाऱ्या पादचारी पुलाचा स्लॅब पडल्याने अपघात होऊन पादचारी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला होता. अशाप्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी महनगरपालिकेने शहरातील सर्व पादचारी मार्गांचे सर्वेक्षण केले होते. वाशीमधील वसाहत व पामबीच रोडच्या मधील नाल्यावरील तीन पादचारी पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
सेक्टर १५ मधील बुद्धप्रतिष्ठानजवळील पूल, सेक्टर १४ मधील पाईपलाईनवरील पादचारी पूल व वाशी कोपरखैरणे नाल्यावरील पादचारी पुलाच्या जागेवरही नवीन पुल तयार केला जाणार आहे. यासाठीची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. निवीदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली जाणार आहे. या कामांसाठी जवळपास ४ कोटी ७६ लाख रुपये खर्च होणार आहेत.
वाशीमधील जुन्या व जीर्ण झालेल्या पुलांच्या जागेवर नवीन पादचारी पुल तयार केला जाणार आहे. यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
संजय देसाई, कार्यकारी अभियंता, महानगरपालिका