नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने २०२२ - २३ या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी ६०६ कोटी ६ हजार रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. अभय योजनेचा १२०६८ नागरिकांनी लाभ घेतला असून त्या माध्यमातून १०९ कोटी ३७ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. वर्षभरात थकबाकीदारांविरोधात मोहीम राबवून १५० पेक्षा जास्त मालमत्तांवर कारवाई केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ताकराचा मोठा वाटा आहे. अर्थसंकल्पामध्ये या विभागाला ५७५ कोटी रूपयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विभागाच्या प्रमूख अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक मालमत्ताकर वसूल करण्यात यश मिळविले आहे. ३० मार्चला रामनवमीची सुट्टी असतानाही मालमत्ता कर भरण्यासाठी सर्व कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. आर्थिक वर्षाच्या एक दिवस अगोदर गुरूवारी दुपारपर्यंत ६०६ कोटी ६ हजार रुपयांचा कर संकलीत झाला आहे. मालमत्ता कर थकबाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून अभय योजना जाहीर केली होती. १५ मार्चपर्यंत कर भरणारांना थकीत कराच्या थंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सूट देण्यात आली होती. १६ ते ३१ मार्च दरम्यान ५० टक्के सूट देण्यात आली होती. १२०६८ जणांनी या योजनेचा लाभ घेतला असून १०९ कोटी ३७ लाख रुपये जमा झाले आहेत. अभय योजनेची माहिती सर्व नागरिकांना व्हावी यासाठी प्रसारमाध्यमे, समाज माध्यमांच्या माध्यमातून माहिती प्रसारीत करण्यात आली. ध्वनीक्षेपकावरूनही गल्लोगल्ली आवाहन करण्यात आले होते.
थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. वर्षभरात १५० पेक्षा जास्त थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या होत्या. यापैकी १०० पेक्षा जास्त थकबाकीदारांनी कर भरणा केला आहे. मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या नागरी सुविधा या नागरिकांकडून करापोटी येणाऱ्या रकमेतून पुरविल्या जातात. यामुळे मालमत्ता कर हा नागरिकांनी शहर विकासासाठी लावलेला हातभार आहे. करभरणा वेळेत करणाऱ्या नागरिकांविषयीही आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
वर्षनिहाय संकलीत झालेला मालमत्ता करवर्ष - कर संकलन२०१९ - २० - ५५८ कोटी२०२० - २१ - ५३४ कोटी२०२१ - २२ - ५२६ कोटी२०२२ - २३ - ६०६ कोटी ६ हजार