नवी मुंबईत विक्रमी रक्त तपासणी
By admin | Published: November 10, 2015 12:29 AM2015-11-10T00:29:07+5:302015-11-10T00:29:07+5:30
भरती होवू लागले आहेत. रक्ततपासणीसाठी फक्त १८ तज्ज्ञ कर्मचारी असून महिन्याला तब्बल पावणेदोन लाख तपासण्या केल्या जात आहेत.
नवी मुंबई : पालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयामध्ये ३०० बेडची क्षमता असताना दोन महिन्यांपासून सरासरी ४२५ रूग्ण भरती होवू लागले आहेत. रक्ततपासणीसाठी फक्त १८ तज्ज्ञ कर्मचारी असून महिन्याला तब्बल पावणेदोन लाख तपासण्या केल्या जात आहेत. रूग्णांची वाढती संख्या व त्याप्रमाणात मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडू लागला आहे.
नवी मुंबईमधील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शहरात दोन महिन्यांपासून तापाची साथ सुरू असून उपचारासाठी महापालिकेकडे पुरेशी सुविधाच नाही. पालिकेची चारही माताबाल रूग्णालये जवळपास बंद अवस्थेमध्येच आहेत. सर्व भार वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयावर पडत आहे. हॉस्पिटलची बेडमर्यादा ३०० आहे. परंतु रूग्णांची संख्या वाढल्यामुळे सद्यस्थितीमध्ये रोज ४०० ते ४२५ रूग्ण भरती केले जात आहेत. अत्यंत दाटीवाटीने बेड ठेवून उपचार सुरू आहेत. नाईलाजाने अनेक रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयात पाठवावे लागत आहे. यामुळे नाराज झालेले नातेवाईक व लोकप्रतिनिधींच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. रूग्णांची संख्या वाढली असली तरी त्या प्रमाणात कर्मचारी नाहीत. यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना ८ ऐवजी १२ तास किंवा जास्त वेळ काम करावे लागते. अनेकांना महत्त्वाच्या कामासाठीही सुट्टी घेता येत नाही.
पालिका रूग्णालयामध्ये बाह्य रूग्ण विभागात पूर्वी १ हजार ते बाराशे रूग्ण यायचे. परंतु जुलैपासून रोज सरासरी १८०० ते २ हजार रूग्ण येत आहे. शहरात तापाची साथ सुरू आहे. डेंग्यू व मलेरियाचे रक्ततपासणीसाठी व इतर तपासण्या करण्यासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. पालिका रूग्णालयामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी १८ टेक्निशियन आहेत.
महिन्याला जवळपास पावणेदोन लाख प्रकारच्या तपासण्या हे कर्मचारी करत आहेत. प्रत्येकाला जवळपास दुप्पट काम करावे लागत आहे. डॉक्टर, परिचारिका या सर्वांवरील ताण प्रचंड वाढला आहे. रूग्णालयामधील गर्दी आटोक्यात आणताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय नागरिक, रूग्णांचे नातेवाईक, लोकप्रतिनिधी यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक जण डॉक्टर व इतर अधिकाऱ्यांशीही उद्धट वर्तन करू लागले आहेत. आयसीयू, एनआयसीयू युनिटमध्ये जागा नसल्याने खाजगी रूग्णालयात किंवा मुंबई महापालिकेच्या रूग्णालयामध्ये पाठवावे लागत आहे. कर्मचाऱ्यांवरील ताण दूर व्हावा व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नुकताच संप केला होता. प्रशासनाने तत्काळ नवीन रूग्णालये सुरू करावी. वाशी रूग्णालयामध्ये आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)