- नामदेव मोरेनवी मुंबई : नवीन वर्षामध्येही लसूण दरवाढीचा विक्रम सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाला २२० ते ३७० रुपये किलो भाव मिळाला. किरकोळ मार्केटमध्ये लसूण ४४० ते ६०० रुपये किलो दराने विकला जात आहे. संपूर्ण राज्यात लसणाची टंचाई निर्माण झाली आहे.
गतवर्षी लसणाचे उत्पादन कमी झाल्यामुळे हंगामाच्या शेवटास संपूर्ण देशात तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही भाव वाढू लागले आहेत. बुधवारी मार्केटमध्ये ६९ टन आवक झाली आहे. प्रतिकिलो २२० ते ३७० रुपये किलोचा भाव मिळाला आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये विभागाप्रमाणे लसणाला भाव मिळत आहे.
राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये लसणाचे दर वाढले आहेत. सातारा बाजार समितीमध्ये २५० ते ४०० रुपये दराने विक्री झाली. सोलापूरमध्ये २६० ते ३७०, पुणेमध्ये १५० ते ३५० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. उच्चभ्रू नागरिकांची वसाहत असलेल्या परिसरामध्ये लसूण ६०० रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर ठिकाणी ४४० पेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांनी लसणाचा वापरच कमी केला आहे.