पालिकेकडून २०५० कोटींची विक्रमी वसुली

By admin | Published: May 4, 2017 06:21 AM2017-05-04T06:21:35+5:302017-05-04T06:21:35+5:30

रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच २०५० कोटी ९२ लाख रुपये उत्पन्नाचा

Record collection of 2050 crores by Municipal Corporation | पालिकेकडून २०५० कोटींची विक्रमी वसुली

पालिकेकडून २०५० कोटींची विक्रमी वसुली

Next

नवी मुंबई : रौप्य महोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच २०५० कोटी ९२ लाख रुपये उत्पन्नाचा टप्पा पूर्ण केला आहे. एलबीटी विभागाने जानेवारी ते मार्च महिन्याच्या अनुदानासह तब्बल १०२२ कोटी रुपये वसूल केले आहेत. ६४५ कोटी २७ लाख रुपये मालमत्ता कर वसूल झाला असून, पालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा २ हजार कोटींचा टप्पा पार करण्यास पालिकेला यश आले आहे.
ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई देशातील पहिली महानगरपालिका. १९९५-९६मध्ये ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला; परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त १८ कोटी ५८ लाख रुपये वसूल करण्यात यश आले. एवढे कमी उत्पन्न असलेली नवी मुंबई तेव्हा देशातील एकमेव महापालिका ठरली होती. पुढील दोन वर्षांमध्येही अनुक्रमे ३७ कोटी व ५५ कोटी एवढे उत्पन्न प्राप्त झाले. १९९८मध्ये पहिल्यांदा १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्यात यश आले. यापूर्वी सेस व आता एलबीटी आणि मालमत्ता कराच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित कण्यात आले. उत्पन्न वाढविण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत एमआयडीसी हाच राहिला; परंतु उद्योजकांनी कर भरण्यास नकार देऊन न्यायालयात धाव घेतली होती. महापालिका व उद्योजकांमध्ये अनेक वर्षे करवसुलीवरून संघर्ष सुरू होता. यामधून मार्ग काढत २०१०-११ या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करण्यात आला. २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल २०५० कोटी रुपये उत्पन्न करण्यात यश मिळविले आहे.
महापालिकेने मागील आर्थिक वर्षात एलबीटी व मालमत्ता कर विभागाचा कारभार उमेश वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला. उत्पन्नाच्या दोन्ही प्रमुख विभागांचा कारभार एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने उत्पन्न वाढविण्यामध्ये यश आले आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये ८७० कोटी रुपयांची वसुली झाली होती. २०१६-१७ या वर्षामध्ये त्यामध्ये वाढ करून ८८३ कोटी रुपये प्रत्यक्षात वसूल करण्यात आले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांचे १३८ कोटी ९० लाख रुपये अनुदान ३१ मार्चला महापालिकेकडे वर्ग केले आहे. ३ एप्रिलला ते प्रत्यक्षात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. अनुदानाची रक्कम गृहित धरल्यास एलबीटीच्या माध्यमातून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख रुपये वसूल करण्यात यश मिळाले आहे. शासनाने एलबीटी रद्द केल्यानंतरही नवी मुंबई महापालिकेने विक्रमी वसुली करण्यात यश मिळविले आहे. मालमत्ता कराचे उत्पन्नही ५९० कोटींवरून ६४५ कोटी रुपये झाले आहे. मूळ कराबरोबर मागील थकबाकी वसूल करण्यातही पालिकेला यश आले आहे.

नोटाबंदीमुळे ५२ कोटींची वसुली

केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा देऊन मालमत्ता कर भरण्यास मुभा देण्यात आली होती. या योजनेचा चांगला फायदा झाला. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ५३ दिवसांमध्ये तब्बल ५२ कोटी रूपये महसूल जमा झाला. यामुळे एकूण महसूल वाढविण्यात यश आले.

एलबीटी विभागाचे यश
२०१५-२०१६ या आर्थिक वर्षामध्ये एलबीटी विभागाकडून ८७० कोटी रूपये महसूल जमा झाला होता. २०१६-२०१७ या वर्षामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यांतील शासन अनुदान गृहित धरून तब्बल १०२२ कोटी ४१ लाख (अनुदान वगळून ८८३ कोटी) रूपयांचा महसूल संकलित झाला आहे. महसूल संकलनासाठी वर्षभरामध्ये तब्बल ११०० थकबाकीदारांची खाती गोठविण्यात आली आहेत. उपकराची जुनी ७० कोटी रूपयांची वसुली करण्यात आली आहे. जुने व्यापारी शोधून १६८०० कर निर्धारणा करण्यात आल्या आहेत.

Web Title: Record collection of 2050 crores by Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.