नवी मुंबई : महापालिकेने आयोजित केलेल्या वॉकेथॉनने गर्दीचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वच्छ नवी मुंबईचा संदेश दिला. फिफाच्या पार्श्वभूमीवर मनपाने आयोजित केलेल्या या उपक्रमातील गर्दीची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉडर््समध्ये होणार आहे.फिफाच्या निमित्ताने स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविण्यासाठी आयोजित या वॉकेथॉनमध्ये ११२ शाळांमधील ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. करावे सेक्टर ३८ मधील गणपतशेठ तांडेल मैदानापासून महापालिका मुख्यालय व श्री गणेश रामलीला मैदानापर्यंत दोन्ही बाजूने वॉकेथॉनचे नियोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनाच स्वच्छतेचे दूत केले होते. स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड अॅम्बेसेडर शंकर महादेवन यांनी याप्रसंगी फिफा फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने नवीन जिंगल सादर केली. जोसेफ ब्रदर्स यांनी स्वच्छतेविषयी पॉप गीत सादर केले. महापालिका शाळा क्रमांक ६ ते ११२ करावे यांनी लेझीमच्या प्रात्यक्षिकातून एनएमएमसी ही अक्षरे साकारली. वॉकेथॉनच्यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदाताई म्हात्रे, संदीप नाईक, अविनाश लाड, आयुक्त रामास्वामी एन., पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, शुभांगी पाटील, डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे विजय पाटील, विशाल डोळस, नेत्रा शिर्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.वॉकेथॉनसाठी दिघा ते बेलापूरपासूनच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना शाळेपासून तांडेल मैदानापर्यंत घेऊन येण्यासाठी एनएमएमटी बसेसची सोय करण्यात आली होती. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रत्येक विद्यार्थ्याला बस मिळाली का यावर लक्ष ठेवून होते.
पालिकेच्या वॉकेथॉनला विक्रमी प्रतिसाद, गर्दीच्या विक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 2:37 AM