महाड : महाड तालुक्यात सावित्री नदी आणि खाडीपात्रामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसीलदार संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. सावित्री खाडीपात्र ओवळे येथे बेकायदा वाळू उत्खनन करणारे तीन सक्शन पंप महसूल विभागाच्या पथकाने खाडीत बुडवले. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई करून संबंधितांकडून १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याखेरीज एका ठिकाणी आढळून आलेल्या वाळूसाठा करणाऱ्याला १० लाख ३८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महाड तहसीलकडून देण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून तहसीलदार कदम यांनी राबवलेल्या या धडक कारवाईच्या मोहिमेमुळे अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. बिरवाडी प्रदीप कदम यांच्या मालकीच्या एमएच ०४ २६५५ डंपरमधून अवैध खाडीची वाहतूक करताना तहसीलदारांनी पकडून ट्रकमालकावर दंडात्मक कारवाई केली. मोहीम सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वाळू उत्खननातून १० लाख ३८ हजारांची महसूल वसुली
By admin | Published: March 23, 2016 2:22 AM