नवी मुंबई : महानगरपालिकेत कायम कामगारांच्या रिक्त जागा न भरता कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून अतिरिक्त काम करून घेतले जात असल्याची तक्रार कंत्राटी कामगारांनी केली आहे. प्रशासनात कर्मचारी भरती करताना कायम कामगारांची भरती करण्याची लेखी मागणी काँग्रेसचे रोजगार व स्वयंरोजगार विभाग, नवी मुंबईच्या वतीने गुरुवारी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाने केली. कंत्राटी सेवा बंद करावी, असे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असूनही नवी मुंबई महापालिका कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून काम करवून घेत आहे. नागरी सुविधा पुरविण्याचे तसेच नागरी समस्या सोडविण्याचे काम आणि रुग्णालयीन आरोग्य सांभाळण्याचे काम कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून करवून घेतले जात आहे. डेंग्यू, मलेरिया या साथीच्या आजारांवर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेंतर्गत फवारणी, डास उत्पत्तीस्थळांची पाहणी याकरिता कंत्राटी कामगारांकडून जास्तीचे काम करवून घेतले जाते, अशी तक्रार कंत्राटी कामगारांनी केली. कंत्राटी कामगारांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे रोजगार व स्वयंरोजगार विभाग, नवी मुंबईचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. कंत्राटी कामगारांच्या परिश्रमामुळेच नवी मुंबई महापालिका प्रशासनाला राज्यात ‘संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियाना’त प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दोन वेळा मिळाला आहे. कंत्राटी कामगारांनी आपली सेवा कायम करण्यासाठी आजवर महापालिका मुख्यालय ते मंत्रालय अशी आंदोलने अनेक वेळा केली आहेत. न्यायालयाचे व मंत्र्यांचे दरवाजेही ठोठावले आहेत. तथापि या कामगारांची सेवा आजतागायत कायम झालेली नसल्याचे सांगत रवींद्र सावंत यांनी निवेदनातून नाराजी व्यक्त केली आहे.कामगारांना कंत्राटी तत्त्वावरच ठेकेदारांच्या माध्यमातून काम करावे लागत आहे. सेवा कायमस्वरूपी आवश्यक असतानाही कंत्राटी पद्धतीने का करवून घेत आहे, ठेकेदारांचे चोचले पुरविण्यासाठी कंत्राटी संकल्पना राबविली जात असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
कायम कामगारांची भरती करावी
By admin | Published: November 28, 2015 1:30 AM