नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय व कारागृहातील रिक्त असलेल्या पदांसाठी होत असलेल्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा बुधवार, ११ एप्रिल रोजी होणार आहे. नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये ही चाचणी घेतली जाणार आहे. यावेळी पात्र उमेदवारांनी ओळखपत्रासह परीक्षेच्या वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे पोलीस आयुक्तालयामार्फत सूचित करण्यात आले आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाईच्या रिक्त १७५ जागा व कारागृह विभागातील शिपाई पदाच्या २३ जागा यासाठी मागील महिन्यापासून भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार एकूण १९८ जागांसाठी सुमारे २८ हजार उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. त्यांची कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी नुकतीच पार पडली आहे. या दोन्ही चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी ११ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता नेरुळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर घेतली जाणार आहे. या भरतीसाठी सामाजिक आरक्षणांतर्गत मागील अनुशेष व बिंदुनामावलीनुसार रिक्त पदे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यानुसार निश्चित गटातून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच उमेदवारांची बुधवारी चाचणी घेतली जाणार आहे. त्याकरिता पात्र उमेदवारांनी वेळेच्या काही मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र असे ओळखपत्र सोबत घेवून येण्याचेही सूचित केले आहे. त्याव्यतिरिक्त खाद्यपदार्थ, मोबाइल तसेच इतर कोणतेही विद्युत उपकरण सोबत बाळगण्यास मनाई करण्यात आलेली आहे.>उमेदवारांच्या या लेखी चाचणीच्या निमित्ताने पोलिसांकडून स्टेडिअमभोवती व आतमध्ये चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. उमेदवार व्यतिरिक्त इतरांना केंद्रात प्रवेश नाकारला जाणार आहे. तर चाचणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर सक्त कारवाई केली जाणार आहे. शिवाय संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी स्टेडिअममध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.
पोलीस भरतीची लेखी परीक्षा ११ एप्रिलला, राज्यभरातील उमेदवारांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 2:36 AM