धोकादायक घरांचा पुनर्विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:14 AM2018-06-28T02:14:12+5:302018-06-28T02:14:15+5:30
येथील केएल टाईपची घरे मोडकळीस आली आहेत. या घरांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. इमारतींची नियमितपणे पडझड सुरू आहे.
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : येथील केएल टाईपची घरे मोडकळीस आली आहेत. या घरांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. इमारतींची नियमितपणे पडझड सुरू आहे. या घरांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने अतिरिक्त एफएसआय मंजूर केला आहे. परंतु सिडको आणि महापालिकेच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न रखडला आहे. शेकडो कुटुंबे मोडकळीस आलेल्या या घरांमध्ये जीव मुठीत घेवून जगत आहेत.
कळंबोलीत सिडकोने केएल-२ आणि केएल-४ टाईपच्या बैठी घरे बांधल्या आहेत. परंतु काही वर्षातच या इमारती निकृष्ट ठरल्या आहेत. पावसाळ्यात भिंतीला तडे जाणे, प्लास्टर निखळणे, छतातून पाणी गळणे आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी घरांची पडझड सुरू असल्याने रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या घरांची पुनर्बांधणी करण्याबाबत १९९0 पासून येथील रहिवाशांचा संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु आश्वासनाच्या पलीकडे येथील रहिवाशांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले आहेत.
मध्यंतरीच्या काळात सिडकोने येथील घरांची जुजबी डागडुजी केली. परंतु तीसुध्दा तकलादू ठरल्याचे दिसून आले आहे. त्यावर उपाय म्हणून या सर्व घरांची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. १९९२ मध्ये येथील रहिवासी आत्माराम पाटील यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार राज्य शासनाने यासंदर्भात चार वेळा अध्यादेश काढले. सूचना व हरकतीही मागविण्यात आल्या. परंतु कार्यवाही काहीच झाली नाही. त्यानंतर २0१३ मध्ये येथील दोन्ही टाईपच्या घरांचे संरचनात्मक अहवाल तयार करण्यात आला. यात येथील सर्व घरे धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले होते.
असे असले तरी सिडकोने केवळ ९५ सदनिकाच धोकादायक असल्याचे जाहीर करून येथील रहिवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आॅडिट रिपोर्टच्या अहवालावरून काही इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका धोकादायक यादी समाविष्ट करण्यात आल्या. परंतु त्याच इमारतीतील तळमजल्यावरील सदनिका मात्र राहण्यास योग्य असल्याचे नमूद केले. यावरून रहिवाशांत नाराजी पसरली आहे.