नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळची प्रकल्पपूर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. विशेषत: या प्रकल्पाच्या मार्गात प्रमुख अडथळा असलेल्या उलवे नदीचा प्रवाह बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. नदीचा प्रवाह बदलण्याचे काम अत्यंत जिकरीचे असल्याने या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. नैसर्गिक प्रवाह बदलल्याने भविष्यात कोणताही प्रसंग उद्भवू नये, या दृष्टीने उपाययोजना केल्या जात असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सिडकोच्या माध्यमातून त्याची उभारणी केली जात आहे. सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळावरून डिसेंबर २०१९ मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, असा अंदाज सिडकोकडून व्यक्त करण्यात आला होता; परंतु प्रकल्पबाधित गावांचे स्थलांतर व इतर कारणास्तव आता ही डेडलाइन हुकणार आहे. असे असले तरी सिडकोने प्रकल्पाच्या कामावर भर दिला आहे. सिडकोच्या वतीने विमानतळासाठी दोन वर्षांपूर्वी सुमारे दोन हजार कोटींची प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली होती. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, जमिनीचे सपाटीकरण, उपऱ्या अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्या भूमिगत करणे व उलवे नदीचा प्रवाह बदलणे आदी कामांचा समावेश होता.सध्या ९३ टक्के पूर्ण झाल्याचा दावा सिडकोकडून करण्यात आला आहे. उर्वरित १७ टक्के कामे प्रगतिपथावर आहेत. यात उलवे टेकडीची छाटणी आणि उलवे नदीचा प्रवाह बदलणे या प्रमुख कामांचा समावेश आहे. टेकडी कातरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर उलवे नदीचा प्रवाह बदण्याचा कामालाही गती देण्यात आली आहे. पुढील काही महिन्यांत ही दोन्ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.विमानतळासाठी दहा गावांचे स्थलांतर करण्यात येत आहे. सध्या जवळपास ८५ टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. स्थलांतराला विविध कारणांमुळे विमानतळाची डेडलाइन हुकल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाल्याने उर्वरित १५ टक्के ग्रामस्थही लवकरच स्थलांतर करतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.>पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी प्रयत्नविमानतळासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे सपाटीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे आजूबाजूच्या गावात पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी येथील ग्रामस्थांना भीती वाटत आहे. मात्र, तशी कोणतीही शक्यता बळावणार नाही, या दृष्टीने सिडकोकडून उपाययोजना केल्या जात आहेत.या संदर्भात केंद्रीय जल आणि पुणे येथील विद्युत संशोधन केंद्राने सुचविलेल्या उपाययोजनांचे कोटेकोरपणे पालन केले जात आहे. याअंतर्गतच उलवे नदीचा प्रवाह बदण्याची कार्यवाही केली जात आहे, तसेच नदीच्या परिसरात बंधारा बांधला जात आहे. आम्रमार्गातील पुलाचे रुंदीकरण, विमानतळाच्या दक्षिणेकडील राष्ट्रीय महामार्ग ४ बी परिसरात सरफेस ड्रेनेज सिस्टीम आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
नदीचा प्रवाह बदलण्याचे काम जिकरीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:16 PM