नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील लोकसंख्येच्या अनुषंगाने शहरात विविध नोडमध्ये निवारा केंद्रांची आवश्यकता आहे. परंतु शहरात गेल्या अनेक वर्षांपासून एकच निवारा केंद्र असल्याने शहरातील बेघर निराश्रित नागरिकांना पदपथ, रेल्वे स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत मुक्काम करावा लागत आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे निवाऱ्यावाचून नागरिकांची फरफट होत असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.बेघरांना वास्तव्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी न्यायालयाने ५ मे २०१० रोजी एक लाख लोकसंख्येमागे एक रात्र निवारा केंद्र महापालिकांनी उभारण्याचे आदेश दिले होते. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या सूचनांचे पालन अद्याप करण्यात आलेले नाही. नवी मुंबई शहरात सुमारे ११ लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. देशातील विविध भागांतून नवी मुंबई शहरात आलेले परंतु निवाऱ्याची सोय नसलेले नागरिक नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत. नवी मुंबई शहरात महापालिकेने श्रमिक नगर येथील समाज मंदिर आणि तुर्भे सेक्टर २० येथे निवारा केंद्रे सुरू केली होती, परंतु विविध कारणांनी सदर केंद्रे बंद पडली आहेत. सध्या समहापालिकेचे सीबीडी सेक्टर ११ येथील उड्डाणपुलाखाली एकच निवारा केंद्र सुरू आहे. या निवारा केंद्रात कोरोना काळात सुमारे २५ बेघर नागरिक दाखल झाले होते. सध्या या ठिकाणी सुमारे १२ नागरिक वास्तव्य करीत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून घणसोली येथे निवारा केंद्राचे काम पूर्ण झाले आहे, परंतु विविध कारणांस्तव सदर केंद्र सुरू झाले नाही तसेच कोपरखैरणे येथील केंद्राचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील बेघर नागरिकांची निवाऱ्यावाचून फरफट होत आहे.
बेघरांचे सर्वेक्षणही नाहीशहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने त्यांची संख्या माहीत असणे गरजेचे आहे. परंतु महापालिकेच्या माध्यमातून अद्याप सर्वेक्षणदेखील करण्यात आलेले नाही.