वृद्धेला दाखल करून घेण्यास नकार, नेरुळमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 11:51 PM2020-07-17T23:51:15+5:302020-07-17T23:52:13+5:30
नेरुळ येथील एका ९३ वर्षीय महिलेला देखभालीसाठी वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने वृद्धांची चाचणी केली असता, या ९३ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्धांची देखभाल शक्य नसल्याच्या कारणावरून वृद्धांना पालिका रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.
नेरुळ येथील एका ९३ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोना झाल्याने त्यांना पालिका रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आली होती, परंतु त्या अंथरुणाला खिळून असल्याचे समजताच, कोविड सेंटरमध्ये देखभाल शक्य नसल्याच्या कारणावरून रुग्णवाहिका रिकामी परत गेली.
नेरुळ येथील एका ९३ वर्षीय महिलेला देखभालीसाठी वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने वृद्धांची चाचणी केली असता, या ९३ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पालिकेला कळविले असता, त्यांना कोविड सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आली. परंतु रुग्णवाहिका दारात आली असता, त्या अंथरुणाला खिळून असल्याचे समजताच रुग्णवाहिकेसोबत असलेल्या कर्मचाºयाने त्यांना सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. यासाठी अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांची देखभाल त्या ठिकाणी शक्य नसल्याचे कारण देण्यात आले.
या घटनेमुळे सदर महिलेचे कुटुंबीय दोन दिवसांपासून चिंतेत आहेत. खासगी रुग्णालयात उपचार परवडणारे नसल्याने पालिका रुग्णालयातच उपचार मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींसह काही पालिका अधिकाऱ्यांशीही त्यांनी संपर्क साधला. यावेळी एका महिला अधिकाºयाने रुग्णाच्या देखभालीसाठी एका नातेवाइकाने सोबत राहण्याचा सल्ला दिला असता, त्याचीही तयारी कुटुंबीयांनी दाखविली, परंतु यानंतरही प्रशासनाकडून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.
खासगी रुग्णालयातून फोनवर फोन
कोरोनाबाधित रुग्णाची माहिती खासगी रुग्णालयांना व्यवसायाच्या उद्देशाने पुरविली जात असल्याची शक्यता आहे. नेरुळच्या या वृद्ध महिलेला न घेता रुग्णवाहिका परत जाताच, महिलेच्या नातेवाइकांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांतून फोनवर फोन सुरू झाले. फोन करणाºयांकडून आपले रुग्णालय कसे सोइस्कर आहे हे सांगून, रुग्णाला आपल्याच रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र, त्यांच्यापर्यंत रुग्ण व कुटुंबीयांची माहिती पोहोचली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.