स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यास नकार; सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक माघारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 05:17 PM2023-10-31T17:17:32+5:302023-10-31T17:17:58+5:30

उरण परिसरात सिडकोच्या अख्यत्यारित असलेल्या विभागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत.

Refusal to provide local police force; CIDCO's anti-encroachment team withdraws | स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यास नकार; सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक माघारी

स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यास नकार; सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक माघारी

मधुकर ठाकूर

उरण : मराठा आरक्षणासाठी सर्वत्र सुरू असलेले आंदोलन आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणास्तव पोलिसांनी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला बंदोबस्त देण्यास असमर्थता दर्शवली.त्यामुळे मोठा लवाजम्यासह उरण परिसरात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कोणतीही कारवाई न करता माघारी परतण्याची नामुष्कीलीची पाळी आली.

उरण परिसरात सिडकोच्या अख्यत्यारित असलेल्या विभागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. परिसरात झालेल्या अतिक्रमणे हटविण्याची सिडकोच्या अनधिकृत अतिक्रमण विरोधी पथकांकडून ठराविक ठिकाणी आणि ठराविक काळावधीत नेहमीच कारवाई केली जाते.मात्र गरिबांच्या टपऱ्या, दुकाने हटविण्याची कारवाई करणाऱ्या सिडकोने कोणत्याही धनिकांच्या अतिक्रमणावर  कारवाई केली असल्याचे अद्यापही ऐकिवात नाही.मात्र गरिबांच्या टपऱ्या, दुकाने हटविण्याची केलेली कारवाई अगदी क्षणभंगुर ठरते. कारण सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवाई पथकाची पाठ फिरताच पुन्हा त्याच जागी जशाच्या तशा टपऱ्या, दुकाने पुन्हा उभी राहतात.त्यामुळे सिडकोच्या कारवाईच्या लवाजम्यावर लाखो रुपयांचा खर्च अनाठायी ठरतो.याबाबत मात्र सिडकोही गंभीर नसल्याचे जाणवते. 

मंगळवारी (३१) उरण परिसरातील सिडकोच्या अख्यत्यारित असलेल्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी सिडकोचे अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख भरत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी ,ट्रक, सुरक्षा रक्षक, पोलिस असा मोठा फौजफाटा उरणमध्ये दाखल झाला होता.
मात्र स्थानिक पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बळ तैनात केला आहे. त्याशिवाय तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.त्यामुळे आधीच पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई करण्यासाठी बंदोबस्त देता येणार नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही पोलिस बंदोबस्त देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली.यावरुन पोलिस व सिडको अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे .  प्रथम जबाबदारी असल्याने सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला पोलिस बंदोबस्त देण्यास उरण पोलिसांनी असमर्थता दर्शवली. स्थानिक पोलीसांनीच कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त नाकारल्यामुळे मोठा लवाजम्यासह उरण परिसरात अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कोणतीही कारवाई न करता माघारी परतण्याची नामुष्कीलीची पाळी आली.अतिक्रमणावर कारवाईसाठी पोलिस, सुरक्षा रक्षक बलाची उणीव आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय कारवाई अशक्य असल्याने पथकाला कारवाईविना माघारी परतावे लागले असल्याची माहिती सिडकोचे  संबंधित विभागाचे अधिकारी मनोज काळे यांनी दिली.

Web Title: Refusal to provide local police force; CIDCO's anti-encroachment team withdraws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.