भूखंड हस्तांतराबाबत सिडकोचे तळ्यात मळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:32 PM2019-09-25T23:32:54+5:302019-09-25T23:33:01+5:30
पनवेल महापालिकेचा पाठपुरावा; सार्वजनिक सुविधांच्या निर्मितीत अडथळा येत असल्याची तक्रार
- वैभव गायकर
पनवेल : सिडकोकडून सार्वजनिक वापरातील विविध भूखंड पालिकेकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापैकी काही भूखंडाचे करारपत्र देखील तयार आहेत. मात्र सिडकोच्या वतीने संबंधित हस्तांतर प्रक्रि येबाबत मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने पालिकेने याबाबत स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना केली आहे.
सिडकोच्या मार्फत आयुक्त बंगला तसेच महापौर बंगल्याच्या भूखंडासाठी जीएसटी आकारण्याच्या निर्णयाला पालिकेने विरोध दर्शविला होता. सिडको महामंडळाने यासंदर्भात जीएसटी प्राधिकरणाकडे धाव घेतली होती. यावेळी जीएसटी प्राधिकरणाने दोन्ही भूखंडासाठी जीएसटी सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयुक्त व महापौर बंगल्याचा मुद्दा मार्गी लागला. मात्र प्रभाग कार्यालये, मुख्यालय, मार्केट यापैकी काही भूखंड जीएसटीच्या दरामधील त्रुटींमुळे हस्तांतर रखडले आहे. सिडकोच्या मार्फत एकूण ३६0 भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. यापैकी सिडकोने दिलेल्या ११९ भूखंडापैकी ८४ भूखंडांचे अलॉटमेंट लेटर तातडीने देण्याची गरज आहे.या भूखंडामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, समाज मंदिर, अग्निशमन केंद्र आदीचा समावेश आहे. मात्र सिडकोच्या इस्टेट आणि नियोजन विभागाच्या मार्फत या हस्तांतर प्रक्रि येला हव्या त्या पद्धतीने गती मिळत नसल्याने पालिकेने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांकडे याबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. हस्तांतर प्रक्रि या वेळेत पूर्ण होण्यासाठी एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पालिकेच्या मार्फत करण्यात आली आहे.
या भूखंडाच्या हस्तांतरात सामाजिक सेवेतील उद्याने, गार्डन, मैदाने आदी देखील प्रति चौरस मीटर ६0 रु पये दराने देण्यात येणार आहेत. या भूखंडाच्या हस्तांतरणात देखील जीएसटी कर लादले गेल्याने पालिकेने या संदर्भात जीएसटी माफ करण्याची मागणी केली आहे.
पालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या जनहितासाठी आमचा सिडकोसोबत पाठपुरावा सुरू आहे. या प्रक्रि येला गती मिळण्यासाठी सिडकोच्या वतीने आवश्यक अधिकारी उपलब्ध होत नसल्याने हस्तांतरणाची प्रक्रि या लांबणीवर पडली आहे.
- शहाजी भोसले, सहायक आयुक्त, पनवेल महापालिका
हस्तांतराच्या प्रक्रि येतील भूखंड
मैदाने, उद्याने, आरक्षित भूखंड १६६
स्मशानभूमी, दफनभूमी २८
प्राथमिक आरोग्य केंद १२
शाळा ९
समाज मंदिर १२
व्यवस्थापन कार्यालये ८
अग्निशमन केंद्र ६
प्रभाग कार्यालय, मुख्यालय ५
मार्केट १४४
एकूण ३६0