राजीव गांधी स्टेडिअमच्या देखभालीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 02:02 AM2019-11-07T02:02:24+5:302019-11-07T02:02:29+5:30
महापालिकेची उदासीनता : अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी आकडता हात
नवी मुंबई : शहरातील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने सीबीडी येथे राजीव गांधी स्टेडिअम उभारले आहे; परंतु अत्यावश्यक सुविधांअभावी या स्टेडिअमची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच काहीशी झाली आहे. खेळाडूंना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथे सराव करावा लागत आहे. एकूणच संबंधित विभागाच्या उदासीनतेमुळे महापालिकेच्या क्रीडाधोरणाला हरताळ फासला जात आहे.
राजीव गांधी स्टेडिअमधील क्रिकेट मैदानाचे गेल्या वर्षी नूतनीकरण करण्यात आले आहे. मैदानाच्या उंचीचा स्तर आंतरराष्ट्रीय निकषानुसार करण्यात आला आहे; परंतु धावपट्टीचा स्तर समपातळीवर नसल्याने खेळाडूंना खेळताना अडचण निर्माण होत आहे. मैदान आणि धावपट्टी समान पातळीवर आणण्यासाठी धावपट्टीच्या क्षेत्रात तीन इंचापर्यंत लाल मातीचा थर टाकणे गरजचे आहे; परंतु महापालिकेच्या संबंधित विभागाने त्यासाठी आकडता हात घेतल्याने सध्या सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून क्रीडा विभागाला सोयी-सुविधा पुरविल्या जातात. त्यानुसार क्रीडा विभागाने स्टेडिअममधील धावपट्टी मैदानाच्या पातळीवर आणण्यासाठी लाल मातीची मागणी अभियांत्रिकी विभागाकडे केली आहे. या मागणीसाठी मागील सात महिन्यांपासून क्रीडा विभागाचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अभियांत्रिकी विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने क्रीडा विभागात नाराजी पसरली आहे. कारण पुढील आठवड्यापासून क्रिकेट प्रशिक्षण सत्र सुरू होणार आहे. सरावासाठी धावपट्टी नसल्याने या मुलांना प्रशिक्षण कुठे द्यायचे, असा सवाल येथील प्रशिक्षकांना पडला आहे. महापालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्टेडिअमचा स्थानिक खेळाडूंना काहीच उपयोग होताना दिसत नाही. खेळाडूंना पुरेशा सुविधा देण्याबाबत संबंधित विभागाकडून आखडता हात घेतला जात असल्याचे दिसून आले आहे.