नवी मुंबई : शासन सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये ९५ हजार घरे बांधणार आहे. यापैकी ९,२४९ घरांची प्रत्यक्ष नोंदणी ११ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही सुरुवात केली जाणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोच्यावतीने रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भूखंड, ट्रक टर्मिनल व इतर ठिकाणी ९५ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही राज्यातील सर्वात मोठी योजना आहे. यामधील ९,२४९ घरांच्या प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी ५ वाजता तळोजा येथील मेट्रो डेपोमध्ये केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र उपस्थित असणार आहेत.