एपीएमसी निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:25 AM2019-11-28T02:25:18+5:302019-11-28T02:25:39+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Registration of bogus voters for APMC elections | एपीएमसी निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी

एपीएमसी निवडणुकीसाठी बोगस मतदारांची नोंदणी

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बोगस मतदारांची नोंदणी सुरू झाली असून, कांदा मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये तब्बल १५४ परवान्यांचे वाटप झाले आहे. या परवान्यांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. प्रत्येक वर्षी जवळपास दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमधून होत आहे. प्रचंड आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व व्यापारी प्रतिनिधींमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते. २००८ मध्ये बाजार समितीची निवडणूक झाली होती. डिसेंबर २०१३ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. यानंतर जवळपास एक वर्ष संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबर २०१४ मध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली. तेव्हापासून अद्याप प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे.

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मुंबई बाजार समितीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याचाच भाग म्हणून ३० नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. २९ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळावर जाण्यासाठी इच्छुक व्यापारी प्रतिनिधींनी बोगस मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. अ वर्ग खरेदीदारांची चौकशी करण्यात यावी व जे प्रत्यक्षात व्यापार करत नाहीत, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

कांदा-बटाटा मार्केटमध्ये २०१७ मध्ये दोन जणांना अ वर्ग खरेदीदार परवान्यांचे वाटप केले होते. २०१८ मध्ये १० जणांनी परवाने घेतले होते. २०१९ मध्ये आतापर्यंत तब्बल २६६ परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यापैकी तब्बल १५४ परवान्यांचे वाटप सप्टेंबरमध्ये झाले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे परवाने दिले असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी कांदा-बटाटा अडत व्यापारी संघटनेनेही बोगस मतदारांची नोंदणी केली जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याविषयी लेखी पत्रही प्रशासनास दिले होते. मार्केटमधील व्यापारी राजेंद्र शेळके यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

शेवटच्या महिन्यात जे अ वर्ग खरेदीदाराचे परवाने वितरित केले आहेत, त्यामध्ये बोगस खरेदीदारांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. यापैकी अनेक जण परवान्यांसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्यक्ष मार्केटमध्येही आलेले नाहीत. ज्या कालावधीमध्ये परवान्यांचे वितरण झाले, त्या कालावधीमधील सीसीटीव्ही कॅमेºयाचे चित्रीकरण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे; परंतु प्रशासनाने त्याला नकार दिला आहे.

सीसीटीव्ही चित्रणाची मागणी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये अ वर्ग खरेदीदार परवान्यांची खैरात वाटण्यात आली आहे. यामधील अनेकांनी प्रत्यक्षात मार्केटमध्ये येऊन परवान्यांसाठी अर्जही केलेला नाही. इच्छुक उमेदवारांनीही नोंदणी केलेली असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अर्ज दाखल झालेल्या कालावधीमधील प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेºयांचे चित्रीकरण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे; परंतु प्रशासनाने चित्रीकरण देण्यास मनाई केली आहे.

एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांनी बोगस मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १५४ परवान्यांचे वाटप झाले आहे. याची चौकशी होऊन बोगस नोंदणी रद्द करण्यात यावी.
- राजेंद्र शेळके,
व्यापारी, कांदा मार्केट

Web Title: Registration of bogus voters for APMC elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.