नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांमधील घोळ समोर आला आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १२ हजार बोगस नावे नोंदविण्यात आली असून बेलापूरमधील याद्यांमधून अनेक नावे गायब झाली आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप होऊ लागला आहे. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १२ हजार बोगस नावे घुसविण्यात आली आहेत. ज्या चाळींमध्ये १०० ते २०० नागरिकही वास्तव्य करत नाहीत, त्या ठिकाणी ७०० ते ८०० मतदारांची नोंद आहे. यामध्ये शहराबाहेरील नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. बोगस नावे वगळण्याची मागणी केली आहे.
बेलापूर मतदारसंघामध्ये नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान नागरिकांनी मतदार नोंदणी केली होती. या मतदारांची नावे यादीमध्ये आलेली नाहीत. याशिवाय अनेक मतदार राहत असलेल्या वार्डमध्ये त्यांची नावे नसून इतर वॉर्डमध्ये गेली आहेत. मतदार याद्यांमधील या घोळाविषयी नागरिक व लोकप्रतिनिधींमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्या. बोगस नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत असून निवडणूक विभाग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ऐरोली मतदारसंघामध्ये १० ते १२ हजार बोगस नावांची नोंदणी झाली आहे. आम्ही याविषयी निवडणूक विभागाकडे तक्रार केली असून बोगस नावे वगळण्याची मागणी केली आहे. - विजय नाहटा, उपनेते, शिवसेना