आधी पुनर्वसन मगच चौथ्या बंदरांचा विस्तार : संतप्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल बंद पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:15 PM2023-12-01T22:15:58+5:302023-12-01T22:16:07+5:30
सहा तास जहाज मालवाहतूक ठप्प: कोटींवधींचे नुकसान
मधुकर ठाकूर
उरण : वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे आधी पुनर्वसन करा त्यानंतर चौथ्या बंदरांचा विस्तार करा या मागणीसाठी शुक्रवारी (१) संध्याकाळी संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए समुद्र चॅनल रोखुन बंदराची जहाज मालवाहतूक बंद पाडली.ग्रामस्थांनी समुद्रात छोट्या मच्छीमार बोटी आडव्या टाकून अचानक समुद्र चॅनल बंद पाडल्याने जागतिक स्तरावरील जेएनपीए बंदरातील मालवाहू मागील सहा तास बंद पडल्याने खळबळ उडाली आहे.
जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी हनुमान कोळीवाडा गावाची जमीन संपादन करून त्याचे उरण येथील बोरी येथे पुनर्वसन केले आहे.१७ ऐवजी फक्त २ हेक्टर क्षेत्रातच २५६ कुटुंबाचे ३८ वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आले आहे.मात्र हनुमान कोळीवाडा गावातील २५६ घरांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे.त्यामुळे १७ हेक्टर क्षेत्रावरच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मागील ३८ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.या ३८ वर्षात ५०० हून अधिक बैठका झाल्या मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्याने ग्रामस्थांचा जेएनपीए विरोधात संघर्षच सुरुच आहे.
दरम्यान जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पुनर्वसनासाठी विकासित १०.५० हेक्टर जमीन जेएनपीए कामगार वसाहती नजीक देण्याचे मान्य केले आहे.त्याची कार्यवाही सुरू असुन केंद्र सरकारकडे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित आहे.मात्र केंद्र सरकारने या बाबतीत ठोस निर्णय घेतला नसल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
शुक्रवारी (१) जेएनपीए कामगार वसाहतीत चौथ्या बंदरांच्या विस्तारित जेट्टीबाबत जनसुनावणी घेण्यात आली.मात्र पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत जनसुनावणी घेण्यात येऊ नये अशी भूमिका हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली.मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी २० मच्छीमार बोटींच्या सहाय्याने जेएनपीए बंदराचे समुद्र चॅनल रोखुन ठेवले.
या आंदोलनात सुमारे ५०ते ६० ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.समुद्र चॅनलच बंद केल्याने जागतिक स्तरावरील जेएनपीए बंदरातुन कंटेनर मालाची जहाज मालवाहतूक मागील सहा तासांपासून ठप्प झाली आहे.हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करा त्यानंतर चौथ्या बंदरांचा विस्तार करा अशी ताठर भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.लेखी आश्वासनाखेरीज आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी लोकमतला सांगितले.
आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली.मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.यामुळे मात्र जेएनपीए अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.