सूर्यकांत वाघमारे, वैभव गायकर / नवी मुंबईरायगड जिल्ह्यातील दुरवस्था झालेल्या चार एस. टी. डेपोंची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यामधील श्रीवर्धन डेपोसाठीची निविदा प्रक्रिया अंतीम टप्यात असून त्यानंतर महाड, पेण व पेण रामवाडी डेपोंची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यामुळे मोडकळीस आलेल्या व दुरवस्था झालेल्या डेपोंना नवीन झळाळी येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पेण विभागीय कार्यालयाअंतर्गत आठ डेपोंचा समावेश होतो. यामध्ये कर्जत, पेण, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, रोहा, माणगाव व महाड डेपोंचा समावेश होतो. बहुतांश डेपोंची उभारणी करु न ३५ ते ४५ वर्ष झाली आहेत. अनेक ठिकाणी इमारती धोकादायक बनल्या आहेत. वाढलेले प्रवासी व त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी डेपोंची पुनर्बांधणी करण्याची मागणी होवू लागली आहे. या मागणीची दखल घेवून व प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व डेपोंची पुनर्बांधणी करण्याचे धोरण परिवहन विभागाने आखले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात चार डेपोंची पुनर्बांधणी केली जात आहे. श्रीवर्धन डेपोसाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून पुढील दोन महिन्यात डेपोच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. महाड डेपोची पुनर्बांधणी करण्यासाठीचे आराखडे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्राथमिक आराखडा व अंदाजपत्रक तयार केल्यानंतर पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पेण एस. टी. डेपोची इमारत बांधून जवळपास पाच दशकांचा कालावधी झाला आहे. डेपोची रचना तेंव्हाचे प्रवासी गृहीत धरून करण्यात आली होती. शहराचा झपाट्याने विकास होत असून रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणे म्हणून पेणची ओळख झाली आहे. येथील प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी पेण एस. टी. डेपोची पुनर्बांधणी केली जाणार आहे. येथील आगार व डेपोची जागा एकत्रीत करून नवीन भव्य एस. टी. डेपो तयार केला जाणार आहे. यासाठी प्राथमिक तयार सुरू करण्यात आली आहे. येथील आगार रामवाडी डेपोत हलविले जाणार आहे. रामवाडी डेपोची इमारतही धोकादायक झाली आहे. तिचे पीलर खचू लागले आहेत. प्लास्टर कोसळत आहे. डेपो परिसरातील डांबर उखडून गेले आहे. येथे बस आली की धुळीचे लोट उडत आहेत. इमारतीमधील सांडपाणी वाहून नेणारे गटार तुंबले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. डेपोच्या आवारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रायगड जिल्ह्यातील डेपोंची सुधारणा व पुनर्बांधनी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून टप्प्याटप्प्याने डेपोंचे काम केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील चार एसटी डेपोंची पुनर्बांधणी
By admin | Published: January 24, 2017 5:59 AM