- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कुर्ला येथील दोन हत्या व १७ पॉक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या रेहान कुरेशी याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याविषयी माहिती मिळवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यावरून बलात्कारावेळी पुन्हा एखाद्या मुलीची हत्या झाल्यास तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची त्याची तयारी होती अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर कबूल केलेल्या गुन्ह्यांव्यतिरिक्त इतर कोणत्या गुन्ह्यात त्याचा समावेश आहे का ? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
राज्यभर खळबळ उडवणाऱ्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या १९ गुन्ह्यांत अटकेत असलेला रेहान कुरेशी सराईत गुन्हेगार आहे. लैंगिक आकर्षणातून तो अल्पवयीन मुलींवर बलात्कार करायचा. कुर्ला नेहरुनगर येथील २०१० मध्ये सुरुवातीच्या दोन गुन्ह्यांत दोन मुलींची हत्या झाल्याने तो भयभीत झाला होता. मात्र, त्यानंतरही पोलीस पकडू न शकल्याने आत्मविश्वास बळावल्याने तो वेगवेगळ्या शहरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करू लागला. अल्पवयीन मुलगी पाहिली की तो पाठलाग अतिप्रसंग करायचा. एक ते दोन दिवसाआड तो अल्पवयीन मुलींच्या शोधात सर्वत्र फिरायचा. त्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरात सलग गुन्हे केले. यादरम्यान पुन्हा एखाद्या मुलीचा मृत्यू झाल्यास पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असायचा. अटकेनंतर पोलिसांनी रेहानचा मोबाइल व लॅपटॉप ताब्यात घेऊन तो तपासणीला पाठवला आहे. त्यावर इंटरनेटच्या वापराची माहिती पोलिसांनी तपासली. त्यामध्ये ब्ल्यू फिल्मसह मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, शवविच्छेदन कसे करतात याविषयीची माहिती सातत्याने शोधल्याचे समोर आले आहेत.गुन्ह्णासाठी घराबाहेर असताना तो फोन बंद ठेवत असल्याने घरच्यांच्या संपर्कात नसायचा. याबाबत आईने केलेल्या चौकशीत त्याने ‘आपण काहीतरी चुकीचे करत असून, त्यात फसले जाऊ’ अशी भीती व्यक्त केलेली. परंतु घरच्यांनी त्याचे गांभीर्य घेतले नव्हते. यामुळे त्याने इतरही अनेक गुन्हे केल्याची शक्यता आहे. त्याकरिता मागील दहा वर्षांत त्याने वास्तव्य केलेल्या सात ठिकाणच्या परिसरातील उघड न झालेले पॉक्सोचे गुन्हे पुन्हा तपासले जाणार असल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांनी सांगितले. शिवाय त्यात त्याच्या कुटुंबीयांचाही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचाही तपास होणार आहे.