नवी मुंबई : व्यापाऱ्यांसह माथाडी कामगारांनी संप मागे घेताच, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत झाले आहेत. गुरुवारी १२७३ वाहनांमधून १६,४४८ टन कृषिमाल विक्रीसाठी आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.
राज्य शासनाने विधेयक मागे घेतल्यानंतर बुधवारी सायंकाळी कामगारांसह व्यापाऱ्यांनीही संप मागे घेतल्याची घोषणा केली. मध्यरात्रीपासून भाजी व फळ मार्केट सुरू करण्यात आले. पहाटेपर्यंत भाजी मार्केटमध्ये राज्याच्या विविध भागांमधून ५१३ ट्रक व टेम्पोमधून आवक झाली होती. रविवारी मार्केट बंद, सोमवारी कमी झालेली आवक व पुढील दोन दिवस असलेल्या बंदमुळे किरकोळ मार्केटही ओस पडली होती. एपीएमसीमध्ये पहाटेच किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दिवसभरात १८९० टन कांदा, ८८० टन बटाटा व ९६ टन लसूनही विक्रीसाठी आल्याची नोंद आहे.
बंदमुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मार्केटमध्ये विक्री न झालेली फळे फेकून द्यावी लागली होती. मार्केट सुरू झाल्यानंतरही पहिल्या दिवशी फक्त १४५ टन मालच विक्रीसाठी आला होता. धान्य व मसाला मार्केटमधील व्यवहारही सुरळीत सुरू झाले असून, शुक्रवारी व शनिवारी आवक वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.