रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी केली रुग्णालयाची तोडफोड, नवी मुंबईतील घटनेत चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 06:27 AM2020-10-29T06:27:10+5:302020-10-29T06:27:47+5:30
Navi Mumbai News : वाशीतील पालिका रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड करीत, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.
नवी मुंबई : वाशीतील पालिका रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड करीत, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणी वाशी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यात मृत व्यक्तीच्या दोन मुलांचाही समावेश आहे.
जुहूगाव येथील व्यंकट सूर्यवंशी (४८) यांना मंगळवारी दुपारी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर आजार असल्याने त्यांना यापूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या वेळी नातेवाइकांनी यांच्या मृत्यूला रुग्णालय व्यवस्थापनाला जबाबदार धरत त्यांनी रुग्णालयात घुसून काचेचे दरवाजे, टेबल-खुर्च्या यांसह उपचाराच्या अत्यावश्यक उपकरणांची तोडफोड केली. रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण केली. शिवाय आयसीयू विभागात घुसून उपकरणांची तोडफोड केली.
दरम्यान, रुग्णालयात उपस्थित पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड सुरूच होती. त्यापैकी मद्यधुंद अवस्थेतील दोघांच्या हातात शस्त्रे होती, असेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
या घटनेत सफाई कर्मचारी, परिचारिका तसेच डॉक्टर जखमी झाले आहेत. तोडफोड करणाऱ्यांनी एका सहायक पोलीस निरीक्षकाचीही कॉलर पकडून ठार मारण्याची धमकी दिल्याचे समजते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवत चौघांना अटक केली. संदेश सूर्यवंशी, रूपेश सूर्यवंशी, पंकज जाधव व रोहित नामवाड अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण, कामकाजात अडथळा तसेच मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काही वेळासाठी काम बंद करून आपला निषेध व्यक्त केला.
रुग्णालयाला २४ तास बंदोबस्त
रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तोडफोडीत अत्यावश्यक उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. रुग्ण दगावल्यास डॉक्टर व परिचारिकांना होणाऱ्या मारहाणीमुळे वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयासाठी २४ तास पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त,
नवी मुंबई महापालिका