अभियंता पदासाठी अट शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:38 AM2018-12-16T05:38:24+5:302018-12-16T05:38:49+5:30
प्रकल्पग्रस्तांना फटका : एम्प्लॉईज युनियनचे मुख्यमंत्र्यांना साकडे
नवी मुंबई : सिडकोच्या स्थापत्य विभागात सध्या सहायक अभियंता पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु या भरतीसाठी उमेदवारांना एक वर्षाच्या अनुभवाची अट घालण्यात आली आहे. ही अट प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या मुळावर बेतणारी ठरली आहे. त्यामुळे अनुभवाची अट शिथिल करा, अशी मागणी सिडको एम्प्लॉईज युनियनने केली आहे. यासंदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
मागील काही वर्षात प्रकल्पग्रस्त तरुणांचा शिक्षणाकडे ओढा वाढला आहे. अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहेत. गेल्या मागील शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी पदवी संपादित केलेले अनेक प्रकल्पग्रस्त तरुण आहेत. अनुभवाच्या अटीमुळे या उमेदवारांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे सिडकोने त्वरित ही अट शिथिल करून प्रकल्पग्रस्त तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी युनियनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाबाधितांसाठी सिडकोच्या वतीने विविध पुनर्वसन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पाल्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी सिडको तारा कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून प्रकल्पग्रस्त तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. एकूणच प्रकल्पग्रस्तांची मुले चांगले शिक्षण घेवून सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीसाठी सक्षम व्हावेत, हा यामागचा सिडकोचा हेतू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना निवेदन दिले.
सिडकोच्या स्थापत्य विभागात ७६ सहायक अभियंता पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांना एका वर्षाच्या अनुभवाची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे फ्रेश पदवी घेतलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. ही अट शिथिल केल्यास विमानतळबाधित गावांसह नवी मुंबईतील अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांना न्याय मिळणार आहे.
- जे.टी.पाटील, सरचिटणीस
सिडको एम्प्लॉईज युनियन