कुवेतच्या तुरुंगात अडकलेल्या नाशिकच्या तरुणांची सुटका; बुडालेल्या जहाजातून वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 09:14 AM2024-03-02T09:14:25+5:302024-03-02T09:14:33+5:30

ऑल इंडिया सिफेरर्स युनियनने केली मदत

Release of Nashik youth stuck in Kuwait jail; A survivor from a shipwreck | कुवेतच्या तुरुंगात अडकलेल्या नाशिकच्या तरुणांची सुटका; बुडालेल्या जहाजातून वाचले

कुवेतच्या तुरुंगात अडकलेल्या नाशिकच्या तरुणांची सुटका; बुडालेल्या जहाजातून वाचले

- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नाशिकमधील दोन तरुण डिसेंबर २०२३ मध्ये नोकरीसाठी इराणमधील जहाजावर गेले होते. परंतु, कुवेतच्या किनाऱ्यावर  जहाज बुडाले. सुदैवाने ते दोघे वाचले, मात्र तेथील तुरुंगात अडकले होते. अखेर ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही तरुणांची सुटका झाली असून, १ मार्चला ते सुखरूप मुंबईत परतले आहेत. 

आविष्कार जगताप व निवृत्ती बागूल अशी सुटका झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना एका एजंटने सेल्फ इमिग्रेशनच्या माध्यमातून इराणला पाठविले होते. तेथील जहाजावर नोकरी करत असताना १९ जानेवारीला कुवेतच्या किनाऱ्यावर त्यांचे जहाज बुडाले. जहाजावरील इतर सहकारी बुडाले. परंतु, आविष्कार व निवृत्ती हे दोघे बोटीतून सुखरूप किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. कुवेतमधील अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकले. शेतकरी कुटुंबातील या तरुणांना सोडविण्याचे आव्हान कुटुंबीयांसमोर उभे राहिले होते. ऑल इंडिया सिफेरर्स युनियनने यापूर्वी अशाप्रकारे विदेशात अडकलेल्या तरुणांची सुटका केल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व अध्यक्ष संजय पवार यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी कुवेतमधील भारतीय  दूतावासाशी संपर्क साधून दोन्ही तरुणांची सुटका केली.

एजंटकडून होते फसवणूक
नोकरीची गरज असलेल्या तरुणांना इराण, मलेशिया, दुबई, सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये पाठविले जाते. या व्यवसायात अनेक बोगस दलालही सक्रिय झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून जहाजावर गेलेल्या तरुणांची कागदपत्र काढून घेतली जातात. अनेक तरुण तेथे अडकत असून, अशा प्रकारे तरुणांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या दलालांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही सिफेरर्स युनियनने नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे. 

एक महिन्यापासून कुवेतमध्ये अडकलो होतो. ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे तेथून सुटका झाली व पुन्हा मायदेशी परत आलो आहोत. 
- आविष्कार जगताप, 
निवृत्ती बागूल, 
नाशिक

दोन खलाशी कुवेतमध्ये अडकल्याचे निदर्शनास आले. संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांची सुखरूप सुटका करण्यास सहकार्य केले. 
- संजय पवार, अध्यक्ष, 
ऑल इंडिया सिफेरर्स युनियन

Web Title: Release of Nashik youth stuck in Kuwait jail; A survivor from a shipwreck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.