नवी मुंबई : तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या आतील भागात दगडाखाली लपून बसलेल्या सुमारे ११ फूट लांब अजगराची सर्पमित्रांनी सुटका केली.
कारागृहाच्या आतील भागात एक मोठा साप घुसला असल्याची माहिती पुनर्वसू फाउंडेशनचे सर्पमित्र धीरज ताम्हाणे व शेरोण सोनवणे यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सर्पमित्र नितीन आडे देखील तेथे उपस्थित होते. जेलच्या आतील परिसरात सर्कल चारच्या मागे कैदी काम करत असलेल्या ठिकाणी साधारण ११ फूट लांबीचा अजगर दगडात घुसून बसल्याचे सर्पमित्रांच्या लक्षात आले.
धीरज, शेरोण, नितीन तिघांनी अजगरास सुखरूप रित्या पकडले, त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सापांविषयी माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्पमित्रांच्या कौतुक करत संस्थेचे आभार मानले. त्यानंतर सर्पमित्रांनी अजगराला कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री करून वनविभागास कळविले आणि अजगरास सुखरूप रित्या जंगलात सोडून दिले.