नवी मुंबई: गेल्या दोन अडीच वर्षापासून ठप्प झालेल्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपास सिडकोला पुन्हा मुहर्त मिळाला आहे. शुक्रवारी द्रोणागिरी विभागातील ४१ भूखंडांची सोडत काढण्यात आली. येत्या काळात उर्वरित प्रकरणांचाही जलदगतीने निपटारा करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. दरम्यान, सिडकोच्या या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. साडेबारा टक्के भूखंड वाटपातील भ्रष्टाचाराच्या रंजक प्रकरणांमुळे सिडकोची मोठी बदनामी झाली आहे. परंतु सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संजय भाटीया यांनी हा भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या. त्यानुसार सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांच्यावर साडे बारा टक्के भूखंड योजनेची जबाबदारी टाकण्यात आली. व्ही. राधा यांनी सर्वप्रथम सर्व फाईल्सचे स्कॅनिंग केले. त्यानंतर बिल्डर्स व एजेंट लॉबीला चाप लावून थेट शेतकऱ्यांना प्रवेश दिला. विविध कारणांमुळे भूखंड वाटप रखडलेल्या फाईल्सचे वर्गिकरण करून त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला. परंतु या संपूर्ण प्रक्रियेला खूपच विलंब लागल्याने सिडकोच्या प्रती प्रकल्पग्रस्तांत नाराजी पसरली होती. असे असले तरी सिडकोने आता पुन्हा साडेबारा भूखंड वाटप प्रक्रियेला सुरूवात केली आहे. त्यानुसार द्रोणागिरी येथील ४१ भूखंडांची सोडत काढण्यात आली. याप्रसंगी व्ही. राधा यांच्यासह सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, कंपनी सचिव प्रदीप रथ, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे तसेच मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साडेबारा टक्के भूखंड वाटपाची सोडत
By admin | Published: November 07, 2015 11:35 PM